Monday, 1 April 2024

RD 2.0

 RD 2.0

साधारणपणे एखादा सिक्वेल असेल, पुढचं व्हर्जन असेल, किंवा तत्सम वेळी हे 2.0 किंवा 3.0 वगैरे वापरलं जातं. पण स्वतः च्याच नावासमोर स्वतः च 2.0 लावणे म्हणजे. पण कारण पण तसेच आहे.

साधारण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मला पायांना थोड्या मुंग्या जाणवत होत्या, पोटरी, मांडी आणि तळव्याला. पुण्यातच काही कामानिमित्ताने असल्याने सहज माझी पुण्यातली मैत्रीण डॉक्टर पल्लवी ला फोन केला की मला असं काहीतरी होतंय. ती म्हणाली एकदा येऊन दाखव, आपण बघू. तिच्याकडे गेल्यावर तिने सांगितलं की कदाचित B12 आणि D3 यांच्या कमतरतेमुळे सुद्धा शरीराला काही प्रमाणात मुंग्या येतात. आपण आधी तुझी रक्त तपासणी करून घेऊ. आता मैत्रीणच आहे म्हटल्यावर तिला म्हटलं, मग शोषणारच आहेस रक्त तर इतर तपासण्या पण करून टाकू. शुगर काय हिमोग्लोबिन काय, जे काही सापडणार असेल ते मला तेवढे सगळे तपासून मला सांग. माझ्या सुदैवाने इतर तपासण्या योग्य आल्या, नॉर्मल आल्या. परंतु B 12 आणि D 3 चं प्रमाण मात्र अतिशय कमी झालं होतं. तिला माहित होतं, की माझ्या पुढच्या टूर्स लागलेल्या आहेत. त्यामुळे तिने सल्ला दिला की तू B12-D3 साठी गोळ्या नंतर घेच. मात्र आता काही दिवस पुण्यातच आहेस तर  इंजेक्शन घे, जेणेकरून B12-D3 लवकर वाढेल. त्याप्रमाणे पुढचे तीन आठवडे मी तिच्याकडे तीन इंजेक्शन घेतले. दसऱ्याच्या आसपास मला राजस्थानला जायचं होतं. तिथे जायच्या आधी मी नाशिकचे ऑर्थो सर्जन सागर काकतकर यांच्याकडे गेलो. त्यांनी मला तपासलं. त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या मुंग्या येत होत्या त्या B12-D3 च्या कमतरतेसोबतच मसल पूल मुळे सुद्धा येऊ शकतात. मला टूर वर जायचं असल्याने त्यांनी मला फिजिओथरपिस्ट च्या सल्ल्याने काही व्यायाम सांगितले.

हे सगळं करून मी आणि मंदार 24 तारखेला राजस्थानला रवाना झालो. 24 ते 30 ऑक्टोबर राजस्थान ची टूर झाली होती. तिथे या गोळ्या घेत होतो. काही प्रमाणात व्यायाम झाला. तिथे चालणं सुद्धा झालं पण मुंग्या मात्र कमी न होता वाढत होत्या.

आधी मांडी, पोटरी, तळव्याला होत्याच, आता पोट आणि पाठीला सुद्धा बऱ्याच प्रमाणात मुंग्या जाणवू लागल्या होत्या.  31 तारखेच्या संध्याकाळी परत सागर काकतकर यांची अपॉइंटमेंट घेतली. मात्र त्यादिवशी त्यांनी तपासल्यावर मला सांगितलं, हा कुठेतरी ऑर्थोचा प्रॉब्लेम वाटत नाहीये रे. एक काम करू, आपण एकदा न्युरो कडे जाऊ.

त्यांनीच त्यांचे परिचित डॉक्टर अनुज नेहते, न्यूरोलॉजिस्ट यांना भेटायला सांगितलं.

दुसऱ्याच दिवशी, म्हणजे एक तारखेला त्यांच्याकडे गेलो. त्यांनी मला तिथे तपासलं. माझ्या गुडघ्याला, मांडीला बऱ्याच प्रमाणात मुंग्या होत्या. दोन्ही पाय बऱ्यापैकी बधिर झाले होते. त्यांनी ती छोटी हातोडी  गुडघ्यांवर मारून बघितली, पण मला काहीच सेन्सेशन नव्हते. डॉक्टरांनी मला मला दोन्ही पाय जोडून डोळे मिटून सरळ उभं रहायला लावलं. साधारणपणे अपेक्षा होती की आम्हा पोझिशन मधे आपण स्थिर उभा राहतो. पण नाही, मी एकदम गरम फिरलो. माझा क्षणात तोलच गेला. अर्थात डॉक्टरांना ते अपेक्षित होतंच. ते आणि माझे सासरे बाजूला उभे असल्याने पडलो मात्र नाही. डॉक्टरांनी मला त्याच संध्याकाळी MRI करून घेण्याचा सल्ला दिला. स्पाइनमध्ये काही इशू वाटतो आहे, MRI केल्यावर पुढचं ठरवू असं सांगितल्याने आम्ही तिथूनच MRI करायला गेलो. साधारण पन्नास मिनिट MRI च्या मशीन मध्ये ते कर्कश आवाज ते कानात ऐकून रात्री घरी आलो.

शरीराचा बधिरपणा बराच वाढला आहे असं जाणवत होतं. अक्षरशः छाती पासून पायांच्या अंगठ्यापर्यंत शरीर ऑलमोस्ट पूर्ण बधीर झालं होतं. चालताना तर भयानक त्रास होत होता.

दुसऱ्या दिवशी MRI चे रिपोर्ट घेऊन नेहते सरांकडे पोचलो. रिपोर्ट्स बघून त्यांचा चेहरा जरा चिंतातुर वाटला. त्यांनी सगळं पाहून सल्ला दिला की शक्य असेल तर आज ऍडमिट होऊन जा. सुरुवातीला 5 इंजेक्शन चा कोर्स करावा लागणार होता, जे सलाईन मधून देताना अंदाजे 6 ते 7 तास लागणार होते. घरून येऊन जाऊन हे उपचार घेणं अशक्य होतं. त्यामुळे डॉक्टर हॉस्पिटल मधे ऍडमिट व्हायला सांगत होते.

हे ऐकून मात्र मी, शिवानी आणि हृषिकेश जरा चपापलो. खरंतर ह्या साठी मानसिकरीत्या पण रेडी नव्हतो. घरी जाऊन एकदा आई बाबांना सांगतो, मग ठरवतो, असं डॉक्टरांना सांगून आम्ही घरी आलो. माझी मावशी सुरत मधे प्रॅक्टिस करते. तिला हे सगळं सांगितल्यावर तिने तिथून नेहते डॉक्टरांसोबत चर्चा केली आणि मला ऍडमिट व्हायला सांगितलं. दुसरीकडे डॉक्टर पल्लवी ला सुद्धा हे कळवलं. तिचं म्हणणं सुद्धा हेच होतं की डॉक्टर म्हणत आहेत तर ऍडमिट होऊन जा, उपचार लवकर सुरू होतील. आमची आयुर्वेदिक वैद्य स्नेहा सुद्धा नेहते डॉक्टरांना ओळखत होतो. तिने सुद्धा तेच सुचवलं. दुसरीकडे मावशी कडून सुद्धा होकार आल्याने मी त्याच संध्याकाळी ऍडमिट झालो.

2 नोव्हेंबर 2023 - आयुष्यात पहिल्यांदा हॉस्पिटल मधे ऍडमिट झालो होतो.

माझी आई, शिवानी, तिचे वडील असे तिघे सोबत आले होते. स्पेशल रूम, मग तिथले पेशंट चे कपडे हे सगळे सोपस्कार आटोपून झाल्यावर मला सलाईन सुरू झालं.

रात्री उशिरा ते संपत आलं तेव्हा डॉक्टरांनी येऊन एक बॉम्ब टाकला. ते म्हणाले, आपण तुझी बोन मॅरो टेस्ट करून घेतोय. आधी लक्षात नाही आलं, पण बोन मॅरो टेस्ट करावी लागते आहे हे समजल्यावर आमच्या सगळ्यांची थोडी तंतरली होती. रात्री उशिरा ICU मधे घेऊन माझी बोन मॅरो टेस्ट केली.

ही टेस्ट करताना पाठीमधे ड्रिल केलं जातं. त्यासाठी पाठीत आधी इंजेक्शन देऊन बधीर केली जाते. नंतर मग बोन मॅरो टेस्ट साठी ड्रिल करतात. मात्र मला ना भुल देताना काही जाणवलं ना नंतर ड्रिल करताना.

कारण माझ्या पूर्ण पाठीला मुंग्या आल्या असल्याने पाठ संपूर्णपणे बधीर झाली होती. डॉक्टर ड्रिल करत असताना मी अक्षरशः निवांत बसलो होतो, कारण पाठीला काही जाणवतच नव्हतं.

ज्यांना ह्याबद्दल काही कल्पना नसेल तर, ह्या टेस्ट नंतर पाठीत भयानक कळा येतात. कित्येक दिवस तिथे सतत दुखत राहतं. पाठीत जीवघेण्या वेदना होतात.

पण मला बधीरपणा असल्याने काहीच कळत नव्हतं. टेस्ट नंतर मला पुन्हा माझ्या रूम मधे शिफ्ट केलं. पुढचे 24 ते 30 तास मला स्ट्रिक्टली पूर्ण आडवं - अगदी 180° अंशात झोपायला सांगितलं होतं. हे का सांगितलं ते मला त्याच पहाटे लक्षात आलं. मी जरासा उठायचा प्रयत्न करताच मानेमधे भयानक कळा येऊ लागल्या. मात्र मान पुन्हा गादीवर टेकवताच कळा बंद झाल्या. हा त्रास मला पुढचा किमान महिनाभर सहन करावा लागणार होता.

पुढे चार दिवस हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होतो. दररोज सकाळी नऊ दहा च्या सुमारास एक सलाईन लावलं जायचं. त्यात इंजेक्शन टाकून अतिशय कमी वेगाने ते सुरू ठेवायचे. साधारण साडेसात ते आठ तास हे सलाईन चालायचं. दोन ते सहा नोव्हेंबर मी तिथे ऍडमिट होतो. रोज संध्याकाळी अभिषेक, कुंतक आणि चिन्मय, तर कधी कपलेश हे सगळे हॉस्पिटल मधे पोचायचे. माझ्या आजारपणात घरातले सोडले तर माझ्यासोबत उभे राहणारे, मला धीर देणारे हेच होते. शिवाय त्यांच्या बरोबरीने माझं दुसरं कुटुंब म्हणजे माझी टीम भ्रमंती - मंदार, प्राजक्ता आणि सपना, आणि सोबतच माझ्या स्नेहा आणि पल्लवी ह्या डॉक्टर मैत्रिणी सुद्धा रोज तब्येतीची अपडेट घ्यायच्या.

अभिषेक, कुंतक आणि चिन्मय तर रात्री उशिरापर्यंत थांबायचे. आमच्या गप्पा तर इतक्या रंगायच्या जणू काही आम्ही हॉस्पिटल मधे नाही तर कॉलेज हॉस्टेल रूम मधे बसलो आहोत.

सहा तारखेला सकाळी डॉक्टरांनी जरा लवकर सलाईन लावलं. सात वाजताच सलाईन सुरू केल्यावर आम्हाला प्रश्न पडला की आज लवकर का लावत असावेत.

त्यावर उत्तर मिळालं की आज तुम्हाला डिस्चार्ज देणार आहोत.

फायनली, तिथून बाहेर पडणार तर...

त्या हॉस्पिटलच्या वातावरणाचा जाम कंटाळा आला होता. कधी एकदा तिथून बाहेर पडून घरी जातो असं झालं होतं. संध्याकाळी 5 वाजता डिस्चार्ज मिळाला. मात्र गाडीपर्यंत जाण्यासाठी मला व्हील चेअर घ्यावी लागली, माझ्या दोन्ही, विशेषतः उजव्या पायामध्ये अजिबात त्राण नव्हते. अक्षरशः पाय बधिर झाले होते. त्यामुळे चालणं शक्यच नव्हतं.

कसाबसा घरचे जिने चढून वरच्या मजल्यावरच्या बेडरूम मध्ये जाऊन झोपलो. हुश्श झालं होतं. पण बोन मॅरो टेस्ट मुळे मान मात्र भयंकर दुखत होती. सतत झोपून राहावं लागत होतं. जरा जरी उठून बसलो तरी मानेच्या नसा कोणीतरी खेचतंय इतक्या जीवघेण्या कळा येत होत्या, आणि आडवा झालो की बटण बंद केल्यासारख्या कळा बंद व्हायच्या. त्यामुळे वॉशरूम आणि जेवण या दोनच गोष्टींसाठी उठून बसू शकत होतो. बाकी पूर्णवेळ झोपून राहावे लागत होतं.

8 नोव्हेंबर आणि 9 नोव्हेंबर या दोन्ही रात्री माझ्या आयुष्यातल्या खूप भयानक होत्या. त्यारात्री उठून एका बेडरूम मध्ये जाऊन दार लावून, तोंड झाकून साधारण दीड दोन तास फक्त रडून काढले. दोन रात्र सलग रडून रडून मनातला जो काही निगेटिव्हपणा होता, भीती होती, वाईट विचार होते,  ते सगळे त्या अश्रुंवाटे मोकळे करून दिले आणि स्वतःच्या मनाशी ठरवलं की बॉस खूप झालं, आता आपल्याला या आजारातून जितक्या लवकर होईल तितक्या लवकर बाहेर पडायचं आहे. आता आपण थांबू शकत नाही. आजार झाला आहे हे मान्य करायचं आणि त्याच्यावर मात देऊन बाहेर पडायचं, हे त्या दोन रात्रीच्या रडण्यामधून मी ठरवलं.

मनाने सकारात्मक वागायचं ठरवलं की सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होतात हा अनुभव लगेच आला.

बोन मॅरो च्या test चे निकाल हाती आले होते. देवाच्या कृपेने आणि सर्वांच्या आशीर्वादामुळे सगळ्या टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या. माझ्यासकट माझ्यासोबत असलेल्या प्रत्येक व्यक्तीने टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे हुश्श केलं होतं. थोडक्यात काय तर, आता Oncologist कडे जावं लागणार नव्हतं, तर न्यूरो कडेच पुढची ट्रीटमेंट करायची होती.

पुढे 13 तारखेला डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती. तेव्हा सुद्धा डॉक्टरांनी आधी प्रमाणेच करायला लावलं. डोळे बंद करून पाय जोडून उभं राहिल्यावर आधीपेक्षा कमी पण जरा जास्तच हललो. थोडक्यात, बरं व्हायला अजून वेळ लागेल हे स्पष्ट होतं. तरीसुद्धा आगाऊपणा करत मी डॉक्टरांना विचारलं की, डॉक्टर मला माझ्या टूरवर कधी जाता येईल? तिथे गेल्याशिवाय मी नाही बरा व्हायचो.

डॉक्टर म्हणाले, कधी आहे तुझी टूर?

मी पटकन म्हणालो, तीन दिवसांनी 17 नोव्हेंबर ला. आणि नंतर पुढची 30 डिसेंबर ला.

त्यावर डॉक्टर म्हणाले की, "सॉरी, मी तुम्हाला नोव्हेंबर टूर साठी परवानगी नाही देऊ शकत. पण त्यानंतर तुमची डिसेंबर ची जी टूर आहे त्यासाठी परवानगी देऊ शकतो. मात्र त्यासाठी औषधे वेळेत घेतली पाहिजेत आणि फिजिओथेरपी व्यवस्थित केली पाहिजे."

माझ्यासाठी हे चॅलेंज होतं आणि मी ते स्वीकारलं.

त्या दिवशी रात्रीच्या गोळी पासून तर रोज सकाळी दहा वाजता आणि रात्री दहा वाजता अशा दोन्ही वेळेला न चुकता औषध घ्यायला सुरुवात केली. फिजिओथेरपिस्ट डॉ. वर्षाली ह्यांनी सांगितलेले व्यायाम व्यवस्थित करायचे हे सुद्धा मी पूर्णवेळ पाळलं.

महिनाभर सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पाळण्याचा फायदा दिसू लागला होता. शरीराला येत असलेल्या मुंग्या हळूहळू कमी होतायत असं वाटू लागलं होतं. बऱ्यापैकी सेंसेशन पुन्हा येऊ लागले होते.

दर पंधरा दिवसांनी डॉक्टरांकडे व्हिजिट करत होतोच. प्रत्येक वेळेस आधीपेक्षा बरीच जास्त इम्प्रूमेंट दिसत होती. पुढची अपॉइंटमेंट 27 डिसेंबरला होती. त्यादिवशी नेहमीप्रमाणे त्यांनी हाताची घडी घालून मांडी घालून बसायला सांगितलं आणि मग कुठलाही आधार न घेता उभे राहायला सांगितलं. तेही जमलं. त्यांची ती छोटी हातोडी त्यांनी गुडघ्यावरती मारून पाहिली. बरेच सेन्सेशन आले होते. पायाची रिफ्लेक्स ॲक्शन होत होती. पायाच्या बोटांवर चालायला लावलं, टाचेवर चालायला लावलं. पाय जोडून डोळे बंद करून उभा राहायला सांगितलं. मागच्या दोन महिन्यात शरीराचा बॅलन्स खूप जास्त वाढला होता. जेमतेम अर्धा-एक इंच इकडे तिकडे हललो, डोळे उघडले तर डॉक्टर माझ्याकदे बघून एकदम गोड हसत होते. मला म्हणाले,"अरे वा मस्त प्रगती आहे."

माझा पुढचा प्रश्न होता, "मला परवा टूरवर जायचंय. जाऊ ना?" डॉक्टर तसंच हसत म्हणाले, "बिनधास्त जा, पण काळजी आणि औषधं न चुकता घ्या."

त्यानंतर ताडोबाच्या चार टुर करू शकलो. श्रीलंकेची टूर केली. परत फेब्रुवारी महिन्यामध्ये तीन आठवडे आराम करून पुन्हा ताडोबा केली. त्यानंतर आठ दिवसांची भूतानची टूर केली. मात्र यादरम्यान डॉक्टरने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी, फिजीओथेरपीस्ट ने सांगितलेले प्रत्येक व्यायाम हे वेळेत आणि काटेकोरपणे केल्याचा फायदा दिवसेंदिवस दिसत होता.

आज एक एप्रिल आहे. बरोबर चार महिने झाले माझा आजार डिटेक्ट होऊन. एक नोव्हेंबर ते एक एप्रिल यात मी बरेच अनुभव घेतले. स्वतःला मानसिकरित्या सक्षम कसं ठेवायचं, मनाचं खच्चीकरण होऊ न देता स्वतःला कसं सावरायचं हे या काळात शिकलो.

ही आपल्याला मिळालेली दुसरी लाईफच आहे असं समजून आता जगायला सुरुवात केली आहे. साधारणपणे 95 टक्के रिकव्हरी आहे, असं म्हणू शकतो. अर्थात काही प्रमाणात त्रास होतोच आहे, पण तो हळूहळू करत कमी होईल. सुरुवातीला जे 40 आणि 50 एमजी चे स्टिरॉइड घ्यावे लागत होते, ते आज पाच एमजी वर आले आहेत आणि तेही एक दिवसाआड. हळूहळू तेही प्रमाण कमी होत जाईल. साधारण सहा ते आठ महिन्यांमध्ये सगळ्या गोळ्या बंद होतील.

या सगळ्यात एक मात्र शिकलो, तुम्ही वरवर कितीही फिट दिसत असले, तुम्ही काहीही करत असले तरी तुमच्या सोबत कधी काय होऊ शकतं आपण नाही सांगू शकत. 

आणि दुसरं पण सगळ्यात महत्वाचं,

Trust your doctor, rather than Google.


त्यामुळे वर्स्ट सिनारिओ ची तयारी ठेवायची आणि आपलं बेस्ट सतत देत राहायचं हे मात्र नक्की.


धन्यवाद 😊

7 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. इतक्या मोठ्या आजारातून अगदी हिमतीने बाहेर पडलास दादा.. बिबट्या उगाच म्हणत नाहीत तुला.. काळजी घे, भेटू लवकर. जागृती

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिले आहेस राजेंद्र,उमानी मला इतके सगळे सांगितले नाही पण ती खूप टेन्शन मध्ये असायची,एकदा तर माझ्याशी बोलताना रडायला लागली,तेव्हा मी तिला म्हटलं,सगळं ठीक होईल,काळजी करू नकोस,मी सहज बोलले पण तिला एकदम छान वाटलं.एवढा मोठा आजार असेल मला कल्पनाच नव्हती,मस्त fight दिलीस,अभिनंदन,आता पुढे तुझ्या आयुष्यात सगळे चांगलेच होईल.

    ReplyDelete
  4. खूपच छान लिहलंय राजेंद्र.. आणि तू नक्कीच खूप सकारात्मक प्रतिसाद दिलास ह्या सगळ्याला हे मी सतत बघतोय..
    हे सगळं लिहून तू नक्कीच लोकांना प्रेरणा दिलीस.. असाच मस्त आनंदी आणि सकारात्मक रहा.. तुला खूप खूप शुभेच्छा..

    ReplyDelete
  5. खूपच छान आणि सविस्तरपणे लिहिले आहेस मित्रा. तुझा हा लेख बऱ्याच जणांना प्रेरणा देईल हे नक्की. तब्येतीची काळजी घे आणि मनसोक्त भटकंती करत राहा.

    ReplyDelete
  6. तुझ्यातल्या positive approach साठी सगळ्यात अगोदर तुला सॅल्युट. असं म्हणतात की संकट किंवा संघर्ष एक संधी घेऊन येतं, ती संधी असते त्या संघर्षाला किंवा संकटाला कसं सामोरं जायचं ह्याच्या वाटा शोधण्याची. जो पर्यंत संघर्ष आपल्या वाट्याला येत नाही तो पर्यंत आपण खूप casual असतो. संकट सगळ्यात अगोदर आपलं डोकं शांत राहायला शिकवतं. ह्या सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपल्या सोबत असणारे कुटुंबीय, मित्र आणि डॉक्टर ह्यांची साथ आणि त्यात डॉक्टर चांगलं मिळणं हा आपल्या चांगल्या नशिबाचा भाग असतो.

    असाच सकारात्मक रहा आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव 'संघर्ष अभी बाकी है'

    ReplyDelete
  7. आपलं बोलणं झालं होतं तेव्हा ती नुकतीच सुरवात होती पण तुझ्या बोलण्यातून कुठेही उदास पणा जाणवत नव्हता, तुझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या सगळ्यांचे आभार आणि या सगळ्यातून बाहेर आल्याबद्दल तुझं अभिनंदन 🍫💐

    ReplyDelete