Tuesday, 22 March 2022

वनस्य कथा रम्या: 🐯

    

    ताडोबा


माझ्या फिरण्याच्या छंदामुळे आणि आता त्याच छंदाला व्यवसायाचं स्वरूप दिल्यामुळे वेगवेगळी ठिकाण, तिथली पर्यटन स्थळं, त्या जागेची माहिती आणि इतर गोष्टी जाणून घेता येतात. 

या सगळ्यात मला सर्वात जास्त आकर्षित करणारी जागा म्हणजे जंगल.
        आणि ह्या जंगलांच्या बाबतीत बोलायचं तर ताडोबा हे माझं सर्वात आवडतं ठिकाण, जणू काही माझं दुसरं घर..
ताडोबा म्हटलं कि पाहिलं चित्र उभ राहते ते वाघाचं. बरं वाघ बघण्याचं आकर्षण कोणाला नसततं. खूप लोक आहेत ज्यांना वाघ बघायचा असतो, पण खूप कमी लोक असतात ज्यांना वाघ दिसतो.
        एकदा बघितला तरी दरवेळेस बघावासा वाटतो असा हा रॉयल प्राणी. काही जण बरेचदा गेले असतील सफारी ला, पण त्यांना जंगलात वाघ बघायला मिळाला नाही म्हणून ती परत परत जाण्याचा विचार करतात.ज्यांना दिसतो ते पुन्हा बघायला मिळावा म्हणून जंगलाकडे वळतात. शेवटी कितीही म्हटलं तरी वाघ हे जंगलाचं मुख्य आकर्षण आहे.
        वाघ समोर आल्यावर तुमची काय मनस्थिती होते याचा कित्येक वेळा अनुभव घेतला आहे, तरीसुद्धा प्रत्येक वेळेस अगदी तोच वाघ जरी समोर आला तरी सुद्धा तो अनुभव नवीन असतो.
हा आहे 31 डिसेंबर 2021 च्या सफारी चा अनुभव.
        भ्रमंती तर्फे नवीन वर्ष विशेष टूर होती. मंदार खेडेकर, प्राजक्ता खेडेकर आणि पार्थ खेडेकर हे कुटुंब दरवर्षी नववर्ष स्वागताला माझ्यासोबत ताडोबाला येतं. त्यांच्यासोबत माझे नाशिकचे दोन मित्र अभिषेक पिंगळे आणि लोकेश खैरनार हे सुद्धा आले होते.
        30 डिसेंबरला आम्ही संध्याकाळी सफारी केली. पण आम्हाला साईटींग म्हटलं तर काहीच झालं नाही. खूप शोधत होतो. नवेगावच्या बफर झोन मध्ये आम्ही गेलो होतो. एका ठिकाणी वाघ आहे असं कळलं. तिथे आम्ही तास दीड तास थांबलो पण काय वाघाने काही दर्शन दिलं नाही. शेवटी विचार केला की आज आपल्या नशिबात वाघ नाही. म्हणून आम्ही तिथून परत आलो. दुसऱ्या दिवशी वर्षाचा शेवटचा दिवस 31 डिसेंबर 2021, आम्ही कोलारा बफर झोनचा बुकिंग केलं होतं. सुदैवाने आमच्या गाडीवर माझा खूप चांगला मित्र आशिष जीवतोडे गाईड म्हणून होता. शिवाय इतक्या वेळा येऊन चांगलीच गट्टी जमलेला गोलू बावनकर हा ड्रायव्हर म्हणून होता. ह्या दोघांचा नंबर माझ्या गाडीवर लागल्यामुळे जंगलात शिरतानाच ही खात्री होती की आपल्याला नक्कीच काहीतरी भन्नाट सायटिंग होणार. त्यातून सोबत मंदार होताच, माझं आणि मंदारचे कॉम्बिनेशन आणि लक भन्नाट आहे. आम्हाला दरवेळेस खूप छान सायटिंग होते. सहाला सफारी सुरू झाली. आम्ही जंगलात गेलो. साधारण सात सव्वा सात वाजेपर्यंत जंगल तसे शांत होते. कुठेही कॉलिंग ऐकी येत नव्हतं, ना कुठे पगमार्क्स दिसत होती. वाघ असेल याचं कुठलच नामोनिशाण आम्हाला दिसत नव्हतं. सफारी सुरू होऊन दीड तास झाला पण काहीच दिसत नव्हतं.
        त्याच वेळेस कुठून तरी दुरून एक हरणाचा कॉल आला. चितळ कॉल. अगदी बारीक आला पण नेहमीची सवय आणि जंगलाचा एवढा अभ्यास असल्यामुळे आशिष ला तो पटकन लक्षात आला. त्याच वेळेस अजून एक गाडी आमच्या समोर आली. त्यातील गाईड ने सुद्धा सांगितले की हो आम्हाला पण कॉल ऐकू आलाय.
        आम्ही तिथे गाडी बंद करून थांबलो, थोडी शांतता झाली की परत कॉल आला तर आपल्याला त्या शांत आवाजात ऐकू येईल. साधारण एक अर्ध्या एक मिनिटांनी परत कॉलिंग आलं. ते मात्र मला सुद्धा ऐकायला आलं. मंदार ने पण स्पष्टपणे ऐकलं. आशिष ने एकीकडे हात दाखवला.
        "दादा, चला, आपण तिकडे चाललोय, तुम्ही पटकन बसा" असं म्हणतं गोलू ने गाडी सुरू केली आणि ज्या दिशेने कॉलिंग येत होतं त्या दिशेने गाडी वळवली. थोडासं अंतर पुढे गेल्यावर गाडी थांबवली पुन्हा एकदा अंदाज घेतला आणि त्या दिशेला आम्ही निघालो. कोलारा मध्ये एक तलाव आहे ज्याला आनंदवन तलाव म्हणतात, त्या दिशेने आम्ही निघालो होतो. आनंदवन तलावाच्या जवळ आम्ही पोहोचणार तोच एका वळणावर आम्हाला दोन-तीन जिप्सी थांबलेल्या दिसल्या ज्या मदनापुर गेट वरून आल्या होत्या. आणि त्यातील पर्यटक उभे होते. याचा अर्थ काहीतरी होतं नक्की तिथे.
        जशा गाड्या दिसल्या, तसं गोलू ने गाडी पटकन समोर घेतली. डावीकडच्या झाडीत हालचाल दिसली. गाडी थोडीशी पुढे घेतली आणि नीट बघितलं. आशिष हळूच म्हणाला, दादा तो पहा टायगर.
        जसा तो वाघ समोर आला तेव्हा लक्षात आलं, ती वाघीण होती. हो, ती जुनाबाई होती. जुनाबाई म्हणजेच ताडोबा मधली टी 45 वाघीण. प्रत्येक वाघाला हे असे क्रमांक वनखात्या कडून दिले जातात. वनखात्याच्या रेकॉर्ड मध्ये नावं नसतात, फक्त क्रमांक असतात.
        जुना बाई आमच्या डावीकडून चालत होती. जसजशी ती चालत होतो तशी गोलू गाडी हळूहळू रिव्हर्स मध्ये घेत होता.

        जवळपास सहा ते सात गाड्या मदनापुर गेटच्या आणि कोलारा गेटची आमची एकच गाडी अशा जवळपास आठ गाड्या तिथे होत्या. एका ठिकाणी लक्षात आले की ती रस्ता क्रॉस करायचा प्रयत्न करते परंतु ती अर्ध्या रस्त्यात आली आणि परत मागे वळली आणि ज्या दिशेने आधी जात होती त्या दिशेने जाऊ लागली.
        वनखात्याने जंगलात वनरक्षकांसाठी विविध ठिकाणी कुटी बनवल्या आहेत. त्यातल्याच एका कुटीच्या दिशेने आम्ही आमची गाडी वळवली. त्या ठिकाणी आम्ही पोचता क्षणी आशिष ने गोलू ला एकाच विशिष्ट जागेवर गाडी पार्क करायला लावली. त्याचं म्हणणं होतं की जुनाबाई इथूनच पास होणार आहे.
        हे ताडोबातील गाईड ड्रायव्हर यांचा जंगलाचा आणि वाघांचा अभ्यास किती प्रचंड आहे ह्याचा अनुभव आम्हाला पदोपदी येत होता. अक्षरशः पुढच्या दोन ते तीन मिनिटांमध्ये आमच्या उजव्या बाजूने जंगलातून जुनाबाई डौलदारपणे चालत आली आणि आम्ही जिथे गाडी उभी केली होती त्याच्या बरोबर तीस ते चाळीस फुट समोरून चालत चालत रस्ता क्रॉस करून जंगलाच्या आत गेली. आशिष म्हणाला, चला आता पलीकडे निघेल ती, इथून एक ओढा आहे जो सध्या सुकलेला आहे, त्यातूनच चालत ती बाहेर येईल.
        गोलू ने वेळ न दवडता गाडी वळवली आणि त्या ओढ्याच्या दिशेने आम्ही निघालो. अर्थात तोपर्यंत कोलारा गेटच्या इतरही गाड्या आल्या होत्या. जसे आम्ही ओढ्याच्या क्रॉसिंग ला पोहोचलो, तिथे सगळ्यांनी आपापली जागा धरून ठेवली होती. प्रत्येक गाईड आणि ड्रायव्हरचं कॅल्क्युलेशन असतं, यांचा अभ्यास असतो, त्याप्रमाणे प्रत्येकाने आपली गाडी पार्क केली होती. सात ते आठ मिनिटात जावे लागते जुनाबाई बाहेर यायला.
        थोड्या वेळात ती बाहेर आली, रस्त्याच्या कडेने चालू लागली.  एक दोन ठिकाणी टेरिटरी मार्किंग केलं. त्यानंतर परत पुढे आली आणि आमच्या जीपच्या समोरून रस्ता क्रॉस करून पलीकडे जायला लागली. तशी ती पुढे गेली तसे गोलूने गाडी काढली. तो म्हणाला, आपण आता मागे जाऊ हिच्या.
साधारण पन्नास-शंभर एक फुटांचे अंतर ठेवून जे सुरक्षित अंतर मानला जाते, तेवढे अंतर ठेवून आमच्या गाड्या जुनाबाईच्या मागेमागे हळूहळू चालत होत्या. आम्हाला खरंतर हेड ऑन वाघ हवा होता. पण जुनाबाई मागून चालताना बघायला मिळत होती. तेवढ्यात आमचं नशीब म्हणून की काय जुनाबाई डावीकडे जंगलात वळाली. जशी ती जंगलात वळाली गोलूने गाडी पटकन साधारण शंभर ते दीडशे मीटर पुढे घेतली आणि त्यांनी गाडी थांबवून बंद केली, आणि म्हणाला, घ्या आता येते ती रस्त्यावर. मिळेल तुम्हाला आता हेड ऑन.
          पुढच्या काही क्षणात जंगलात गेलेली जुनाबाई अगदी गोलूचं ऐकल्यासारखं करत परत रस्त्यावर आली आणि आम्हाला हवा असलेला ड्रीम शॉट म्हणजेच हेड ऑन आली. साधारण तीनशे ते चारशे मीटर ती आमच्या गाडी मागे चालत होती. गोलू आरश्यात बघत आणि आशिष च्या सांगण्याबरहुकूम गाडी हळूहळू पुढे नेत होता.
        या सगळ्यात एका गोष्टीकडे आमचा प्रत्येकाचं लक्ष होतं की जुना बाईचं पोट फुगलेला होतं. याचा अर्थ ही गरोदर होती आशिष च्या म्हणण्यानुसार पुढच्या काही दिवसातच तिला पिल्लं व्हायला हवीत.
        अर्थात आम्ही मात्र खुश होतो की आम्हाला वाघीण दिसली. साधारण सात ते आठ मिनिटे गाडीच्या मागे चालून जुना बाई तिच्या एरियामध्ये परत डावीकडे जंगलात चालत गेली. त्यातला भाग नॉन टुरिझम झोन असल्यामुळे आम्हाला आत जाणं शक्य नव्हतं. थोडा वेळ पाठमोऱ्या जुनाबाई कडे बघून गाडी परत मागे फिरवली आणि आम्ही परत त्या कुटीवर आलो जिथे सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला जुना बाई दिसली होती. तिथे येऊन आधी आम्ही कॅमेऱ्यातले फोटो बघितले. आपल्याला कसा व्हिडिओ मिळाला आहे कसे फोटो मिळाले आहेत, हे चेक केलं. अभिषेक आणि लोकेश तर भयानक खुश होते, कारण त्यांनी पहिल्यांदा वाघ एवढा जवळून बघितला होता. जुना बाईला पिल्लं कधी होणार हा प्रश्न मात्र डोक्यामध्ये सतत फिरायला लागला होता. जुनाबाईला आधी दोनदा पिल्लं झाली आहेत. ही तिसरी वेळ आहे तिची. आधीच्या दोन्ही वेळेस पिल्लांनी खूप छान दर्शन दिलं होतं, खूप खेळले होते. त्यांचे खूप सारे व्हिडिओज आहेत. त्यामुळे आता एक्साईटमेंट आहे की कोलारा मध्ये किलबिल कधी सुरू होईल. 
        पुढच्या भागामध्ये १ जानेवारी 2022 सायटिंग बद्दल लिहितो आहे. आवडलं तर नक्की शेअर करा आणि जर हा अनुभव घ्यायचा असेल तर भ्रमंटी टूर्स ला नक्की संपर्क करा.
धन्यवाद 🐯
राजेंद्र देशपांडे