Wednesday, 19 February 2014

मेगाब्लॉक की मेगाहाल


            दर सोमवारी वर्तमानपत्र उघडले की रेल्वेच्या मेगाब्लॉक मुळे नागरिकांच्या झालेल्या गैरसोयीची एक तरी बातमी असतेच. मेगाब्लॉक मुले प्रवाश्यांचे कसे आणि किती हाल झाले हे भरभरून लिहिलेला असता. पण कधी हीच वर्तमानपत्रे मेगाब्लॉक नक्की कशासाठी घेतला होता, मेगाब्लॉक च्या ४-५ तासांत रेल्वे च्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी काय काम केलं हे मात्र नमूद करायचा सोयीस्करपणे टाळतात.
                रेल्वे प्रशासन मेगाब्लॉक का घेते हा प्रश्न उपस्थित करून त्यावर प्रवाश्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या जातात. सुट्टी च्या दिवशी मेगाब्लॉक घेऊन रेल्वे प्रशासनाने काय साध्य केले, असा सवाल करत रेल्वे ला लक्ष्य करतात. यात बरेचदा रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आघाडीवर असतात.

               बरेचदा लोकांचा असाच आक्षेप असतो की आठवडाभर आम्ही रेल्वेने प्रचंड अशा गर्दीत प्रवास करून कामाला जातो, कसेबसे उभे राहायला जागा मिळवून घरी परततो. अशा वेळी सुट्टीचा एकाच दिवस मिळतो तो म्हणजे रविवार. हा एकाच दिवस मिळतो की ज्यादिवशी आपल्या कुटुंबियांसमवेत फिरायला मिळते. त्यांना वेळ देत येतो. मात्र उपनगरीय रेल्वे ने मुंबई मध्ये कुठेही जायचं म्हटला तर दर रविवारी मेगाब्लॉक आडवा येतो.

                आणि मग स्टेशन वर आधी तिकिटांसाठी लांब रांग, मग मेगाब्लॉकमुळे अनेक गाडयांचे रद्द होणे, त्यामुळे स्टेशन आणि पुलांवर वर जमलेली ही गर्दी, अशातून वाट काढून एखादी गाडी पकडली तर ती मेगाब्लॉक मुळे जलद अथवा धीम्या मार्गावरून मेगाब्लॉक असलेल्या भागात दुसऱ्या मार्गावर वळवली जाते. त्यामुळे गाडी ८ ते १० मिनिटे उशिरा गंतव्य स्थानी पोहोचते.
यावर सुद्धा सर्वजण आक्षेप घेतात. पण असा आक्षेप घेणें अथवा लोकांना सुट्टीच्या दिवशी जो त्रास सहन करावा लागतो त्यावर बोलणे हे चूक आहे असे अजिबात नाही.

                पण रेल्वे वर या सर्व गोष्टींचं खापर फोडताना हे आपल्या कधीतरी लक्षात येतं तरी का की रेल्वे गाड्या आणि या रेल्वे गाड्या ज्यावरून सतत ये-जा करतात ते रेल्वे रूळ यांना देखभालीची, दुरुस्तीची आणि प्रसंगी त्यांना बदलण्याचीही गरज पडते. 

केवळ पश्चिम उपनगरीय रेल्वे चा उदाहरण घेउ.

पश्चिम रेल्वेचा चर्चगेट ते विरार , आणि आता चर्चगेट ते डहाणू हा मार्ग उपनगरीय मार्ग आहे. पैकी चर्चगेट ते विरार हा ६० किमी चा मार्ग चौपदरी आहे. म्हणजेच जलद अप, जलद डाऊन, धीमा अप आणि धीमा डाऊन. 
याचा अर्थ एकूण रेल्वे मार्ग झाला ६० * ४ = २४० किमी. 

                 बोरीवली ते बांद्रा पाचवा मार्ग ,  तसेच माहीम ते मुंबई सेन्ट्रल पाचवा मार्ग आहे. त्यांची एकत्रित लांबी साधारण ३० किमी आहे. म्हणजेच चर्चगेट ते विरार दरम्यान एकूण उपनगरीय मार्ग साधारणपणे २७० किमी इतका आहे. मेगाब्लॉक घेतेवेळी साधारणपणे ५-८ किमी चा मार्ग निवडला जातो. एका वेळी ५ किमी चा मेगाब्लॉक असं पकडलं तरी दर रविवारी ५ किमी याप्रमाणे सर्व मार्गाची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी ५४ रविवार लागणार.  याचा अर्थ जर रविवारी एखाद्या भागात मेगाब्लॉक घेतला की पुन्हा त्याच भागाच्या देखभाल/दुरुस्ती साठी मेगाब्लॉक घ्यायला कमीत कमी एक वर्ष उजाडणार. शिवाय एखाद्या रविवारी सणवार आले कि त्या रविवार चा मेगाब्लॉक रद्द केला जातो.

            पश्चिम उपनगरीय रेल्वेवर दिवसाच्या २४ पैकी २२ तास कुठेना कुठे किमान एकतरी गाडी धावत असतेच . अशा परिस्थितीत कार्यालयीन दिवसांत मेगाब्लॉक घेण्यापेक्षा सुट्टी च्या दिवशी मेगाब्लॉक घेणे सोयीचे नाही का. शिवाय उपनगरीय रेल्वे सेवा जरी काही काळ थांबत असली तरीही पश्चिम रेल्वेच्या  जाणाऱ्या गाड्या २४ तास असतातच. त्यामुळे रविवारी मेगाब्लॉक घेण्यावाचून पर्यायच नाही. आपण प्रत्येकजण दर १-२ महिन्यातून किमान एकदा डॉक्टर कडे जातो. नाहीच जरी गेलो तरी आपण आजारी पडणार नाही याची सतत काळजी घेत असतो.

                दररोज सुमारे १२९० फेऱ्या करणारी पश्चिम रेल्वे दिवसाला साधारण ३६ लाख प्रवाशांची ने-आण करते. मग इतक्या मोठ्या सेवेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी जर आठवड्यातून एक दिवस काढला तर काय हरकत आहे.

                काही महिन्यांपासून दर रविवारी होणारी लोकांची गैरसोय पाहून पश्चिम रेल्वे ने रात्रीचे मेगाब्लॉक सुद्धा सुरु केले आहेत. म्हणजेच ज्या मार्गावर रात्री काही वेळ रेल्वे सेवा बंद असते तिथे रात्रभराचा मेगाब्लॉक घेऊन काम केली जात आहेत. त्यामुळे रविवारी दिवसभर रेल्वे सेवा सुरळीत चालू शकते. मात्र हे सर्वच भागांत शक्य नसल्याने काही रविवारी दिवसा मेगाब्लॉक घ्यावाच लागतो.

                 अर्थात हे सर्व मांडताना, जेव्हा रेल्वे कडून मेगाब्लॉकच्या दरम्यान अनेक त्रुटी राहतात, जसे मेगाब्लॉक च्या दिवशी काही स्थानकांवर उद्घोषणा न होणे, मेगाब्लॉक नक्की कुठून कुठपर्यंत आहे ते न कळविणे, गाडी एका फलाटावर ज्या फलाटावर येणे अपेक्षित असताना ती दुसऱ्याच फलाटावर येणे आणि याचीही उद्घोषणा न होणे. यांत नक्कीच सुधारणा करण्याची गरज आहे .

               आपणही जर या सर्व गोष्टींचा सकारात्मक दृष्टीने विचार केला तर आपल्यालाही रेल्वेची बाजू पटू शकेल. जे होतंय ते आपल्यासाठीच असा विचार केला तर सुट्टी हि चांगली जाइल आणि त्यापुढचा आठवडा पण.