Saturday, 1 September 2012

"अतिथी देवो भव:" ?


आशा ताई भोसले..... मुंबई, महाराष्ट्र, भारतच  नव्हे जगात मानानं घेतला जाणार नाव.
अगदी ऑस्ट्रेलियाच्या तेज तर्रार गोलंदाज ब्रेट ली ला सुद्धा आशा ताईंच्या आवाजाची भुरळ पाडली.
इतकी की ब्रेट ली ने भारतात येऊन आशा ताईंसोबत एक गाण्याचा अल्बम केला. संगीत आणि गाणे यांना सीमारेषा नसतात असा म्हटला जातं. म्हणूनच ब्रेट ली सोबतचा अल्बम हिट झाला.
अश्या या आशा ताई एकदम परदेश या विषयावरूनच चर्चेत आल्यात. आत्ताच त्यांचा विषय का?
कारण झालंय सूर-क्षेत्र या कलर्स वाहिनीवरचा नवा रियालिटी शो. या शो मध्ये पाकिस्तानी कलाकारांना प्रवेश दिला गेलाय. त्यावर अनेक लोकांनी आक्षेप घेतलाय. अर्थात आक्षेप घेण्याचं कारणही तसाच आहे. गेल्या काही वर्षात मुंबई, पुणे, बंगलोर, दिल्ली आणि इतरही अनेक शहरांमध्ये जे-जे बॉम्बस्फोट झाले,, त्यात पाकिस्तानचाच हात होता हे सिद्ध झालंय. भारताविरोधात पाकिस्तान अतिरेकी कारवाया करतोय हे जगासमोर सिद्ध झाल आहे. तीन वर्षापूर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याला सुद्धा पाकिस्तान जबाबदार होता हे त्यावेळेस पकडल्या गेलेल्या अजमल कसाब च्या जबानीवरून स्पष्ट झालेलं आहे.
जो देशाने आपल्या भारताविरुद्ध अक्षरशः उघड उघड युद्ध पुकारलाय, त्याच देशाच्या कलाकारांना आपण आपल्या एका राष्ट्रीय वाहिनीवरील कार्यक्रमात गाणे गाण्यासाठी बोलावतो.
एकीकडे पाकिस्तान मध्ये भारतीय कलाकारांना बंदी असताना आपण मात्र "कलेला सीमारेषा नसते" हे पालुपद गात पाकिस्तानी कलाकारांना भारतात गाण्यासाठी बोलावणे हाच खरा देशद्रोह म्हटला पाहिजे.
या गोष्टीचे समर्थन करताना आशा भोसले यांनी तर "अतिथी देवो भव: हि आपली संस्कृती आहे अशी पुस्ती जोडली. याच आशा भोसलेंना पाकिस्तान तिथे येऊन गाण्यास बंदी घालते. आणि आशा ताई मात्र पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेत आहेत. अहो, जर माणसच नाही राहिली तर मग अतिथींचे स्वागत कोण करेल? आज पाकिस्तानने पोसलेल्या दहशद्वाद्यांमुळे अनेक निष्पाप भारतीय लोकांचे प्राण गेले आहेत. आणि आपण मात्र "अतिथी देवो भव:"  चे गोडवे गात त्याच पाकिस्तान्यांसाठी रेड कार्पेट अंथरतोय.
कला, क्रीडा सारख्या अनेक प्रकारांनी भारतानी पाकिस्तानशी संबंध सुरळीत करण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. परंतु पाकिस्तान मात्र दर वेळी भारताच्या पाठीत खंजीर खुपसतो. २००८ मध्ये सुद्धा भारत पाकिस्तान क्रिकेट सामने झाले. तेव्हा मुंबई वर दहशदवादी हल्ला झाला. असंही समोर आले आहे की क्रिकेट सामन्यांच्या वेळेस जे पाकिस्तानी लोक प्रेक्षक म्हणून भारतात आले त्यापैकी अनेक लोक परत पाकिस्तानात गेलेलेच नाहीत.
आताही ह्या कार्यक्रमात पाकिस्तानी गायकांची कौतुकं सुरु आहेत. पुन्हा क्रिकेट सामने घ्या अशीही मागणी होतेय. या गोष्टींसाठी येणारे लोक पुन्हा पाकिस्तानला परत जातीलच याची शाश्वती कोणीतरी देऊ शकेल का?
३१ ऑगस्ट रोजी मनसैनिकांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी आशा भोसलेंच्या कलर्स च्या कार्यक्रमातल्या पाकिस्तानी कलाकारांच्या सहभागाबद्दल नाराजी दर्शवली. आशा भोसलेंनी त्याला प्रत्युत्तर दिले सुद्धा. एकीकडे आशा भोसलेंनी पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेतली त्याच आशा ताई १ सप्टेंबर च्या इंडियन आयडॉल च्या अंतिम सोहळ्यात जेव्हा इंडियन आयडॉल च्या सुरुवातीच्या भागांत सहभागी झालेल्या काही गायकांना (ज्यांची गायकी खरोखर श्रवणीय नव्हतीच)  बोलावून त्यांची खूप जास्त प्रमाणात खिल्ली उडविली गेली, तेव्हा त्यांना म्हणतात " तुम्हाला तर "पद्मश्री पुरस्कार" द्यायला हवा. आता त्यांनी हे जरी मजेत म्हटला असला तरी "पद्मश्री" पुरस्कार हा काही साधासुधा नाहीये. आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्यामुळे पद्म, पद्मश्री इ. पुरस्कार दिले जातात. त्यामुळे निदान आशा भोसले यांसारख्या प्रतिष्ठित लोकांनी तरी या अशा टिप्पण्या करणं टाळावे.
निदान जोपर्यंत पाकिस्तानच्या भारतातल्या अतिरेकी कारवाया थांबत नाही, तोपर्यंत कृपया पाकिस्तानी लोकांची बाजू घेऊन अशा प्रकारचे कार्यक्रम करू नये, अथवा आशा भोसले यांसारख्या कलाकारांनी अशा कार्यक्रमात भाग तरी घेऊ नये...