Monday, 25 April 2022

वनस्य कथा रम्या: 🐯 दोन

मटकासूर- ताडोबा मधला एक प्रसिद्ध वाघ...

वन विभागाच्या नोंदीत टी 54असा नंबर असलेला हा वाघोबा. असं म्हटलं जातं की तो मूळचा ताडोबा मधला नाहीये. तो बाहेरून कुठून तरी आला. ताडोबाच्या बफर एरिया मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तो दिसला होता. त्यानंतर हळूहळू त्याने स्वतःचा एरीया वाढवत नेला. काही वर्ष त्यानी कोलारा मध्ये सुद्धा स्वतःचं राज्य गाजवलं. पांढरपवनी, जामनी आणि कोलारा मधला काही भाग असा त्याचा वावर होता. गब्बर सारख्या वाघाला सुद्धा त्याने तगडी फाईट दिली होती. मटकासुर- अतिशय बोल्ड आणि गाड्या आल्या तरी न घाबरता त्यांच्या आजूबाजूने जाणारा. अश्या मटकासुरला बघणं एक रोमहर्षक अनुभवच असतो असे म्हणता येईल.

    31 डिसेंबर 2021 वर्षाच्या शेवटच्या दिवशी सकाळच्या सफारीत जुनाबाईचं खूप अप्रतिम आणि भन्नाट सायटिंग झालं होतं. संध्याकाळी आम्ही अलिझंझा ची सफारी केली. पण तेव्हा आम्हाला काहीच दिसलं नाही. नाईट सफारी सुद्धा केली. नाईट सफारीला वाघाचे चान्सेस कमी असतात परंतु जो अनुभव आहे तो मात्र अप्रतिम असतो. तो अनुभव घेऊन आम्ही हॉटेलवर आलो. 2021 चा शेवटचा दिवस शेवटची रात्र छान साजरी केली एक जानेवारी दोन हजार बावीस वर्षाचा पहिला दिवस त्या दिवशीची सकाळची सफारी आम्ही घेतली नव्हती दुपारचे सफारी मात्र मी बुक केली होती. कोणाला फर्मातेच आणि आपण नशीब म्हणू काय त्या दिवशी सुद्धा आमच्या नावावर ती खूप अप्रतिम साईटींग दिलेलं होतं मी परत एकदा आशिष ला फोन केला. त्याचा नंबर नव्हता त्या दिवशी, पण मी गेट वरती मला भेटला तो म्हणाला की दादा जीवतोडे म्हणूनच दुसरे गाईड आहेत, यांचा नंबर आमच्या गाडीवर लागला होता. त्यांना मामा म्हणतात. ड्रायव्हर म्हणून गाडीवर मनोज होता. जशी सफारी सुरू झाली तसं मनोजला सांगितले की काल जुनाबाई दिसली, आज काहीतरी वेगळा बघूया". तो म्हणाला ठीक आहे.

    आमचं नशीब एक असं होतं की कोलारा गेट वर  कोअर आणि बफर अश्या दोन्ही झोन च्या गाड्या एकाच रांगेत उभे राहतात आणि मग वेळ झाली की त्यांना सोडलं जातं. त्यामुळे आमचं नशीब अश्या साठी म्हटलं कारण आमच्या गाडीचा नंबर लागल्यावर ती आमच्या गाडीच्या मागे किमान चार ते पाच कोअर च्या गाड्या होत्या आणि साधारण वन खात्याचे नियम आहे की एक गाडी जंगलाच्या आत शिरली की ती साधारण 100 मीटर पुढे गेली की मग त्याच्या मागच्या गाडीला सोडलं जातं, जेणेकरून जंगलात शिरताना गाड्यांमधील अंतर पण मेंटेन केला जातं. आम्ही जसे बफर मध्ये वळलो तेव्हा हे आम्हाला माहिती होतं की आपल्यमागे कोअर च्या  पाच गाड्या असल्याने बफर ची गाडी यायला बराच वेळ लागेल. ह्याचा एकच फायदा की काही मूव्हमेंट मिळाली तरी त्यावेळी बाकीच्या गाड्या यायला वेळ असेल. तोपर्यंत आपलं नशीब आपल्याला अजमावता येईल. मनोजने त्यादृष्टीनेच गाडी फिरवली. एका ठिकाणी पगमार्क दिसले. ते आकाराने थोडेसे मोठे होते. ते पाहता क्षणी मामा म्हणाले, हा मटकासुर च आहे नक्की.

    मनोजने पगमार्क गेले होते त्यादिशेने गाडी फिरवली. पगमार्क फॉलो करत साधारण एक अर्धाएक किलोमीटर आम्ही आत शिरलो होतो. आम्हाला आधी दोन गाड्या दिसल्या. त्या गाड्यांच्या पलीकडे अजून चार गाड्या दिसल्या. जशा त्या गाड्या दिसल्या तसं मनोज म्हणाला, "दादा तिथे टायगर आहे".

    त्याने गाडी पुढे घेतली. जसं आम्ही गाड्यांच्या जवळ पोचलो तसं डौलदारपणे ऐटीत राजा सारखा चालणारा मटकासुर आम्हाला समोर दिसला.

त्याची आमच्याकडे पाठ होती आमच्या विरुद्ध दिशेला तो चालत होता. ज्या दोन गाड्या आमच्या समोर होत्या त्यांच्या बाजूला थोडी जागा होती. तिथून मनोज ने गाडी चालवायला सुरुवात केली. एक गाडी मागे पडल्यावर आमच्या दोन गाड्या फार वेळ चालत होत्या. पण मटकासूर समोर होता आणि त्याच्या समोर साधारण चार गाड्या होत्या. गाड्यांवरचे कोड बघितले तेव्हा लक्षात आले की सहा च्या सहा गाड्या मदनापुर गेट च्याच आहेत. आमच्या कोलारा गेटची आमच्या गाडीच्या व्यतिरिक्त कुठलीच गाडी पोहोचलेली नव्हती. बराच वेळ आम्ही मागेमागे गाडी चालवत होतो. मात्र मटकासूर ला हेड ऑन बघायचं हीच सगळ्यांची इच्छा होती आणि मटकासुर नेच ती इच्छा लवकर पूर्ण केली.

    वाघ जेव्हा जंगलात चालतो तर थोड्या थोड्या अंतरावर तो त्याच्या टेरिटरी चं मार्किंग करत जातो, जेणेकरून त्या भागांमध्ये दुसरा कुठला वाघ आला तर त्याला कळेल तिथे एक राजा ऑल रेडी राहतोय.

    त्यामुळे मटकासुर सुद्धा पुढे कुठेतरी झाडावर टेरिटरी मार्किंग करणार, आणि त्यासाठी रस्त्या सोडणार हे नक्की होतं. मनोज त्याच संधीची वाट बघत होता. थोडं अंतर गेल्यावर अपेक्षेप्रमाणे मटकासुर रस्ता सोडून उजवीकडे वळाला. रस्ता सोडून थोडं आत असलेल्या झाडावर तो मार्किंग करायला गेला. जसा त्याने रस्ता सोडला आणि तो त्या झाडाजवळ पोचला, तसा मनोज ने बरोब्बर फायदा उठवला. अर्थातच सुरक्षित अंतर ठेऊन त्याने आमची गाडी पटकन पुढे दामटली आणि समोरच्या गाड्या होत्या त्यांच्या मागे नेऊन थांबवली.

    आता असा सिन होता की ज्या दोन गाड्यांसोबत आम्ही मागे चालत होतो त्या मागे , मध्ये परत रस्त्यावर आलेला मटकासुर, त्याच्या समोर आमची गाडी आणि आमच्या गाडीसमोर उर्वरित चार पाच गाड्या. आमच्या चेहर्‍यावरचा आनंद तर वर्णन करता येणार नाही इतका होता. कारणही तसंच होतं ना, आम्हाला हवा तसा मटकासुर "हेड ऑन" मिळाला होता. तो आमच्याकडे बघत बघत रस्त्यावर चालत होता. त्याची ती चाल, त्याचा तो पंजा टाकल्यावर जमिनीवरची उडणारी धुळ, त्या पंजाचा आकार, चालताना त्याची ती नजर, सगळं सगळंच स्वप्नवत होतं.

त्या नजरेत दिसत होतं की "बॉस, हा माझा एरिया आहे मी इथला राजा आहे".

    मनोज चं ड्रायव्हिंग स्किल आणि मटकासुरचं ते डौलदार चालणं ह्याचा आनंद आम्ही पुढचा पाउण ते एक किलो मीटर घेतला. दोन्ही आरसे आणि आमचे गाईड, ह्यांच्या सहाय्याने मनोज गाडी बरोब्बर पुढे पुढे नेत होता. मी मागे बसून व्हिडिओ काढत होतो तर मंदार फोटो काढत होता. अभिषेक आणि लोकेश साठी हा दुसरा वाघ होता. पहिली जुनाबाई आणि आज मटकासूर, त्यात त्यांचं नशिब इतकं जोरदार की त्यांना त्यांच्या पहिल्याच जंगल सफारी मध्ये सलग दुसऱ्यांदा हे दोन वेगळे वाघ बघायला मिळात होते.

    साधारण 8 ते 10 मिनिटं हा शो आम्हाला बघायला मिळाला. थोडं चालून झाल्यावर मटकासुर पुन्हा उजवीकडे वळला. आधी वाटलं हा मार्किंग करेल आणि पुन्हा रस्त्यावर येईल. पण साहेबांनी मत बदललं आणि सरळ आत शिरला, आणि झाडीत अक्षरशः दिसेनासा झाला.

    आम्ही थोडावेळ वाट बघूया असं ठरवलं. तितक्यात कोलारा गेटच्या गाड्या सुद्धा तिथे पोहोचल्या. पण तोपर्यंत शो संपला होता. येणाऱ्या गाडीतला प्रत्येक जण वाघ दिसला का, कसा दिसला, कुठे दिसला, असे प्रश्न विचारत होता, आणि आम्ही आम्हाला मिळालेला फोटो दाखवल्यावर आपण उशिरा पोचलो ही खंत त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

    थोडावेळ वाट बघून झाल्यावर सगळ्या गाड्यांची पांगापांग झाली. अलमोस्ट सगळ्या गाड्या त्या दिशेला वळाल्या, ज्या दिशेने मटकासुर जंगलात शिरला होता. पण आमचा जिप्सी चक्रधारी मनोज मात्र वेगळ्याच विचारात पडला होता. त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू होतं. त्याला मंदार, मी दोन तीन वेळा विचारलं सुद्धा की आपण पण जाऊन यायचं का पलीकडल्या बाजूला. मटकासुर येऊ शकतो तिथे.

    पण मनोज अतिशय ठाम होता. त्याचं म्हणणं होतं की मटकासुर इथूनच बाहेर येईल. आम्हाला त्याच्यावर अविश्वास ठेवण्याचं काहीच कारण नव्हतं, पण जंगलात सगळंच अनपेक्षित होत असताना हा इतका ठामपणे बोलत होता, त्यामुळे आम्ही विचार केला की आपण चान्स घेऊयाच.

    मनोज चं कॅल्क्युलेशन असं होतं की, आदल्या दिवशी पाऊस झाला होता. मटकासुर जिथून आता शिरला तिथे कोरडा नाला आहे. पावसामुळे तिथली जमीन ओलसर असल्याने तो जास्त आत न जाता नाल्यातच थांबेल. आणि ऊन उतरल्यावर बाहेर येईल.

    आम्ही आमची गाडी जवळपास पावणेदोन तास एकाच जागेवर उभी ठेवली. ऊन आहे म्हणून एकदोनदा मागेपुढे करायचा प्रयत्न केला, पण वाघ बाहेर आला तर आपल्याला व्यवस्थित शॉट्स मिळायला हवे हे डोक्यात असल्याने 'ऊन तर ऊन पण गाडी हलवायची नाही' असं ठरवलं.

सव्वा तीन ते पाच अशी वाट बघितल्या वर आमची तपश्चर्या फळास आली.

    काही रानगवे चरत चरत त्याच झाडीच्या आसपास शिरले होते. त्यापैकी एखाद्या रान गव्याला मटकासुर तिथे बसला असल्याची चाहूल लागली असावी. जोरदार आवाज आला, ज्याला कॉलिंग म्हटलं जातं. कॉल येताच आम्ही एकदम स्तब्ध झालो. निरव शांततेत तो कॉल मस्त ऐकायला मिळाला होता.

    कदाचित त्या आवाजाने मटकासुर ची झोप डिस्टर्ब झाली असावी. काही क्षणातच त्याच्या गुरकवण्याचा सुद्धा आवाज आला. मी लगेच मंदार कडे पाहिलं. आमच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होतं. कारण मटकासुर आता नक्की बाहेर येणार हे स्पष्ट होतं. आणि झालंही तसंच.

    "तो पहा टायगर आला बाहेर" गाईड मामांनी असं म्हणताक्षणी आमचे डोळे, कॅमेऱ्याची लेन्स, सगळं त्या दिशेला वळालं.

    झाडीतून साहेब बाहेर येत होते. अगदी निवांत हळूहळू पावलं टाकत मटकासुर पुढे पुढे येत होता. ह्या सगळ्यात आमच्या साठी नशिबाची एक गोष्ट होती, ती म्हणजे आजूबाजूला गाड्या नसणं. रान गव्याचा कॉल येण्याआधी जस्ट एक गाडी तिथे पोचली होती. त्यांनी पण तो कॉल ऐकला असल्याने ते सुद्धा वाट बघत होतेच. त्यामुळे आमची गाडी आणि ती दुपारी गाडी वगळता फक्त मटकासुर च तिथे होता.

    थोडावेळ आतून चालत येत तो रस्त्याकडे वळला. आता सुद्धा हेड ऑन घ्यायचा हे ठरवून मनोज बरोबर त्याच्या वेगानुसार गाडी पुढे नेत होता. एकदा मनात विचार आला की मागची गाडी सुद्धा बाजूला आली आणि दोन्ही गाड्यांच्या मागे मटकासुर चालला तर... पण ती वेळच आली नाही. मागच्या गाडीत प्रशांत ड्रायव्हर होता. त्या गाडीतील पर्यटकांकडे कॅमेरा नव्हता. त्यामुळे त्याने "सर आपली गाडी मागे राहू देऊया का, त्यांची गाडी पुढे जाऊ द्या, त्यांना हेड ऑन मिळतील फोटो" अशी विनंती करताच त्या पर्यटकांनी सुद्धा त्याला होकार दिला. (सफारी नंतर आम्हाला हे प्रशांत कडून कळलं).

    पुढच्या 2 ते 3 मिनिटात मटकासुर जंगलातून डावीकडे वळत रस्त्याकडे आला. रस्त्याच्या कडेने थोडा चालत, एखाद दोन झाडांवर टेरिटरी मार्किंग करत रस्त्यावर आला. झालं, पुढचे 15 ते 20 मिनिटं हा शो सुरू होता.

समोर आमची गाडी,सुरक्षित अंतर ठेवून चालत होती. मध्ये मटकासुर ऐटीत चालतोय, आणि त्याच्या मागे काही अंतर सोडून प्रशांत ची जिप्सी चालत होती.
    मटकासुर चे क्लीयर फोटो आणि व्हिडीओ मिळावे म्हणून मनोज बरोबर गाडी चालवत होता. गाडी अंदाजे 100 मीटर वगैरे पुढे नेऊन बंद करायचा. मग मटकासुर ची ती चाल, तो डौल आम्ही कॅमेरा मध्ये टिपायचो. जिप्सी आणि मटकासुर मध्ये एक ठराविक अंतर उरलं की पुन्हा गाडी सुरू करून पुढे नेऊन थांबवायची.

    ह्यामुळे ना मटकासुर डिस्टर्ब होत होता आणि आम्हाला मटकासुर चे भन्नाट फोटो/व्हिडीओ सुद्धा मिळत होते.
वीसएक मिनिटे चालून मटकासुर एका ठिकाणी थांबला. त्याने तिथे आधी मार्किंग केलं, नंतर थोडं पुढे येऊन सायंविधी (💩) केले. आणि मग दोन्ही गाड्यांकडे एक दोनदा बघून आपले फोटो घेतले ना ह्याची विचारपूस करून आत जंगलात वळला. आरामात पावलं टाकत टाकत आत दिसेनासा झाला.

    इकडे आम्ही दोन्ही जिप्सीमधले आनंदाने नाचत होतो. वेळ सुद्धा संपत आलीच होती. आम्ही परतीच्या वाटेवर निघालो तश्या 4 ते 5 जिप्सी रस्त्यात क्रॉस झाल्या. त्यांना मटकासुर शो दिसल्याचं सांगितल्यावर ज्यांना आधी पण दिसला नव्हता ते जरा हिरमुसले.

    इथे आमच्या आनंदाला पारावर नव्हता. मटकासुर चं दर्शन आणि सोबतीला मनोज आणि मामा हयांचं जंगल आणि वाघाबद्दल चे अचूक आडाखे ह्यांनी आज खुश करून टाकलं होतं.

नवीन वर्षाच्या पहिल्या संध्याकाळी भन्नाट सायटिंग झालं होतं.

आम्ही रिसॉर्ट वर परतलो. दुसऱ्या दिवशी सफारी नसल्याने रात्री मस्त निवांत गप्पा मारत, जुनाबाई आणि मटकासुर चे फोटो व्हिडीओ बघत धम्माल केली.

नवीन वर्षाची सुरुवात मस्त झाली होती. बघूया वर्षभरात अजून काय काय बघायला मिळेल...

ब्लॉग आवडला असेल तर जरूर शेअर करा.
जंगलाचे असेच अनुभव प्रत्यक्ष अनुभवायचे असतील तर bhramantea ला जरूर संपर्क करा...

धन्यवाद 🙌🏼