Wednesday, 29 July 2020

🚩🚩 राष्ट्र प्रथम 🚩🚩

🚩🚩 भाग तीन 🚩🚩

आमचं आजचं म्हणजे 25 जुलै सकाळ सत्र टीम क्रमांक 8 चं स्क्रिनिंग चं काम आटोपलं होतं.
आमच्या कडे दोन रंगाचे कागद दिले होते. त्यातील निळ्या कागदावरील नावे जास्त महत्वाची होती. आम्ही जी नोंद केली होती ती पांढऱ्या कागदावर केली होती. स्क्रिनिंग करताना ज्या नागरिकांचे टेम्परेचर सांगितलेल्या रेंजपेक्षा जास्त आणि ऑक्झीमीटर रिडींग रेंजपेक्षा कमी असेल अशा नागरिकांची नावे निळ्या कागदावरील तक्त्यात करायची होती.
थोडक्यात निळा कागद म्हणजे रेड झोन होता.
आम्ही दुकानाजवळ आल्यावर म्हटलं आपला एखादा फोटो काढून घेऊया. आमच्या सहाय्यक मित्राकडूनच फोटो काढून घेतला.

फोटो सेशन करून झाल्यावर त्याने संगितले की आपल्याला प्रतिबंधित क्षेत्राच्या बॅरिकेड पर्यंत जायचं आहे. तिथे पुढची प्रक्रिया केली जाईल. आम्ही चालत तिथे पोचलो. अर्थात ते शंभर दीडशे मीटर सुद्धा आता खूप वाटू लागले होते. PPE किट घातल्याने आतमध्ये घामाने ओलेचिंब झालेलो होतो, त्यात तहानही लागली होती. वर सूर्य तळपत होता. कसेबसे आम्ही त्या बॅरिकेड जवळ पोचलो. तिथे संघाची पुढची फळी उभीच होती. आमच्या कडून सर्व साहित्य घेऊन ते एका बाजूला ठेवलं. त्याबर एक जण सॅनिटायझर मारून ते निर्जंतुक करत होता. तर इकडे आम्हाला प्रत्येकाला रांगेत बाजूबाजूला उभं करून आमचं सॅनिटायझेशन सुरू झालं. दोन्ही हात वर करून सर्व बाजूंनी सॅनिटायझर चा मारा करून आम्हाला अक्षरशः भिजवलं. अर्थात ते गरजेचं आहेच. त्याचसुमारास इतर टीम सुद्धा एक एक करत आपापले एरिया पूर्ण करून कॉमन मिटिंग पॉईंट वर पोचत होत्या.
त्यानंतर प्रत्येकाला एकमेकांपासून पुरेसं अंतर ठेवून आपापले PPE किट काढायला सांगितले. आम्ही प्रत्येक जण सकाळी साडे आठ च्या आसपास घातलेले PPE किट तब्बल साडे चार तासांनंतर काढत होतो. PPE किट वर सॅनिटायझर मारल्याने ते काढताना तो उग्र वास नाकात नव्हे, डोक्यात जात होता. ग्लोव्हज आणि मास्क सगळ्यात शेवटी काढा अशी सूचना असल्याने आधी बूट आणि नंतर वरचा जम्प सूट काढून काळजीपूर्वक एका पिवळ्या रंगाचा पिशवीत भरले. शेवटी ग्लोव्हज आणि मास्क त्यात ठेऊन एका कोपऱ्यात ती पिशवी व्यवस्थित ठेवली. नंतर सगळ्या पिशव्या एकत्र Discard केल्या जाणार होत्या.
मग पुन्हा एकदा रांगेत उभं करून सॅनिटायझर ची जवळपास आंघोळ घातली. आधी घामाने आणि आता सॅनिटायझर ने भिजलेले आम्ही शांतपणे उभं राहून ते एन्जॉय(?) करत होतो. त्यानंतर आमच्या साठी पाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिंबू पाणी ची सोय केली होती.
साडेचार तासांनंतर आमच्या घशात पाणी आणि लिंबू पाणी गेलं. ते पिताच एकदम अंगात तरतरी आली. इतका वेळ शांतपणे हळूहळू बोलणाऱ्या आमचा आवाज पण वाढला. किती लोकांची नोंद केली, किती संशयित सापडले, ह्यावर चर्चा करत आम्ही सगळे "कैलास मठ" च्या दिशेने चालत निघालो. परतीचा प्रवास गाडीने नाही तर चालत करायचा होता. पण लिंबूपाण्याने आमची बॅटरी इतकी मस्त चार्ज झाली होती की निवांत गप्पा मारत मारत आम्ही कैलास मठ ला पोहोचलो.
तिथे अजून एक टीम आमच्या स्वागताला सज्ज होती. आधी वेलकम केलं आणि नंतर पुन्हा एकदा आम्हाला हातावर सॅनिटायझर मारून पुढे आमच्या बॅग च्या काउंटर वर पाठवलं.
बाजूला अंगणात मोठ्या भांड्यात सगळ्यांसाठी पाणी उकळत ठेवलं होतं. प्रत्येकासाठी साधारण एक बादली, मग्गा आणि साबण ठेवले होते. मस्त कढत पाण्याने आंघोळ करून आम्ही ताजेतवाने झालो.
लगेच आमच्या जेवणाची सोय पण झालेली होती. मस्त गरमागरम पुलाव आणि पोळीभाजी असे वेगवेगळे पॅकेट्स रेडी करून ठेवले होते. जशी भूक आहे त्याप्रमाणे प्रत्येक जण एक एक पॅकेट घेऊन जेवायला बसलो.
सकाळी 8 वाजता उपमा खाल्ला होता. आता वाजले होते दीड. म्हणजे जवळपास साडेपाच तासांनी आम्ही काहीतरी खात होतो. ते ही त्यातील साडेचार तास इतकं फिरल्यानंतर. गप्पा तर सुरू होत्या पण त्यापेक्षा प्रत्येकाचं जेवणावर जास्त लक्ष होतं.
जेवण सुरू असतानाच पुन्हा जयेशजींचा आवाज आला, "टीम क्रमांक दोन रेडी आहे का"
हो, दुपारच्या टिम्स रेडी होत्या आणि ज्या प्रमाणे आम्ही सकाळच्या सत्रात मोहिम आटोपून आलो होतो तसे आता त्या टीम्स मोहिमेवर निघत होत्या.
अगदी अंगावर काटा येईल इतका मस्त सिन होता. एक पथक लढाई लढून आलं होतं, दुसरं लढाईवर निघालं होतं. जय श्रीराम ची देवाणघेवाण झाली आणि दुपारच्या टीम एक एक करत त्यांना दिलेल्या एरियात स्क्रिनिंग साठी निघाल्या.
निर्जंतुक झालेले आणि भोजनाची तृप्त झालेले आम्ही सगळे आपापल्या घरी निघून गेलो. मात्र एक होत, की घरी सुद्धा आयसोलेशन मध्ये रहायचं. त्यामुळे निघताना घरी तशी कल्पना देऊन ठेवली होती.

संघाची शिकवण आहेच
🚩🚩 राष्ट्र प्रथम 🚩🚩

देशासमोर उभ्या ठाकलेल्या संकटाला भिडताना त्या लढाईत आपणही आपला हातभार लावतोय ह्या विचाराने खूप मस्त वाटत होतं. ह्याच आनंदात आपापल्या घरी पोचलो ते उद्या सकाळी पुन्हा 8 वाजता मोहिमेत सहभागी व्हायचं हा विचार करतच...

क्रमशः

Tuesday, 28 July 2020

🚩🚩 "संघा वाचून कोण स्वीकारील काळाचे आव्हान" 🚩🚩

🚩 भाग दोन 🚩

फुले नगर, पेठ नाका ह्या भागातील नागरिकांचं आम्हाला स्क्रिनिंग करायचं होतं.
इनोव्हाने आम्हाला तिथे सोडलं. आम्ही चौघे हे काम आयुष्यात पहिल्यांदा करत होतो. मनात थोडी काळजी होती कारण आम्ही ज्या भागात आलो होतो तो भाग "कोरोना बाधित प्रतिबंधित क्षेत्र" होता. त्यामुळे आम्हाला सर्वतोपरी काळजी घेणं अतिशय गरजेचं होतं.
कुठून सुरुवात करायची यावर आमच्या सोबत जो स्थानिक कार्यकर्ता होता त्या मित्रा सोबत बोललो आणि गल्लीच्या तोंडावर एक छोटं दुकान होतं तिथून सुरू करूया असं ठरवून आमची हत्यारं- टेम्परेचर गन, ऑक्झिमिटर, सॅनिटायझर चा स्प्रे आणि नोंदणी चा चार्ट घेऊन सरसावलो.
हे सांगायला नक्कीच आवडेल की आम्ही चाचणी साठी समोर येतोय हे पाहून दुकानातील काका स्वतःहून समोर आले. "दादा, घ्या तपासा मला" अस म्हणताच एक वेगळाच कॉन्फिडन्स आला आमच्या मनात. मग त्यांचा भाऊ पण आला. दोघांचे टेम्परेचर आणि ओक्झिमीटर सुद्धा नॉर्मल होते. ते पाहून जरा हायसं वाटलं.
सुरुवात अतिशय चांगली झाली होती. मग काय, पहिल्या ओव्हर ला सांभाळून खेळल्यावर जसं आत्मविश्वास येतो तसंच झालं आमचं.
एक एक गल्ली सुरू केली. गल्लीत शिरून डावी अन उजवीकडच्या घरात आवाज द्यायला सुरुवात केली. दार बंद असेल तर हात न लावता बेल वाजवायला अथवा दारावर ठकठक करायला एक किल्ली च्या आकाराचं हार्ड प्लास्टिक सोबत दिलं होतं ज्यामुळे आमचा कुठेही इतर स्पर्श होऊ शकणार नव्हता. आमच्या सुरक्षिततेची इतक्या बारकाईने काळजी घेतली होती.
एक एक घरातुन सदस्य बाहेर येत होते. "मावशी, मास्क घाला आणि समोर येऊन तुमचं नाव सांगा" असं म्हणताच त्या काकू/मावशी/आजी लगबगीने आत जाऊन मास्क घालून बाहेर येत होत्या. एक दोन ठिकाणी मास्क नाही सापडलं तर रुमाल/पदर बांधून समोर आल्या. पण बाहेर आल्या हे सगळ्यात महत्वाचं.
काही घरांत मास्क ही परवडत नाही म्हणून घेतले अन घातले नव्हते हे ही एक विदारक सत्य समोर आलं. पण आम्हाला त्याक्षणी त्यांना इतर कोणतीही मदत करणं शक्य नव्हतं.
आधी काही वेळ मी लिहिण्याचं काम करत होतो. श्रीपाद ने टेम्परेचर बघायचं, तर शुभम ने त्या त्या व्यक्तीच्या हातावर सॅनिटायझर मारलं की निनाद त्यांचं ऑक्झिमिटर ने रिडींग घेणार, अशी कामं आम्ही वाटून घेतली होती.
आम्हाला दोन तक्ते दिले होते. पांढरा आणि निळा.
सर्वसामान्य नोंदणी पांढऱ्या तक्त्यात करायची होती. मात्र जर एखाद्या व्यक्तीचे तापमान आणि ऑक्झीमीटर रिडींग हे रेंजच्या बाहेर (कमी किंवा जास्त) असतील तर त्यांची नोंद निळ्या तक्त्यात सुद्धा करायची होती.
अंदाजे 10 ते 12 नावं झाल्यावर निनाद ने तक्ता लिहिण्याचं काम स्वतःकडे घेतलं आणि मला टेम्परेचर चेक करण्याचं काम दिलं (त्याने माझं अक्षर बघितलं होतं आणि हे वाचायला मला बोलवायची वेळ वगैरे येईल असा विचार त्याच्या मनात आला असावा )
असो,
अंदाजे 12:30-12:45 पर्यंत आमचं काम सुरू होतं.
जितक्या घरांमध्ये आम्ही गेलो, त्यात जास्तीत जास्त घरात पुरुष कमी होते कारण बरेचसे कामाला गेले होते. वेगवेगळ्या वयोगटातील लहान मुलं आणि महिला ह्यांच प्रमाण जास्त होतं. एक विशेष म्हणजे बऱ्याच महिलांना त्यांचं वय ही माहीत नव्हतं. बाजूला 2-3 पोरं आणि ते ही अंदाजे 5 ते 8 वर्षांची असताना त्या महिलांना वय विचारलं तर उत्तर यायचं, माहीत नाही, 21 लिहून टाका.
आधी आमची जमा गडबड झाली, पण नंतर आम्ही ठरवलं एकतर त्यांना विचारायचं, किंवा साधारण अंदाज घेऊन लिहायचं.
वर कडक ऊन आणि अंगात PPE किट या डेडली कॉम्बिनेशन ने शरीराची वाट लागली होती. आम्ही आत मध्ये घामाने चिंब भिजलो होतो. दिहायड्रेशन सारखं वाटू लागलं होतं, पण मनात एकच होतं, की आपलं काम संपल्याशिवाय हार मानायची नाही.
सकाळी निघताना गायलेलं "संघा वाचून कोण स्वीकारील काळाचे आव्हान" हे डोक्यात फिट बसलं होतं. त्यामुळे माघार घ्यायचा तर प्रश्नच नव्हता.
काही ठिकाणी गोठे होते, सर्वत्र शेण पडलं होतं, त्यातून वाट काढत आम्ही एक एक गल्ली सर करत चाललो होतो. एक दोन ठिकाणी कुत्री भुंकायला लागल्यावर जरा तंतरली होती आमची. पण टॉमी यु यु वगैरे करत त्यांना मनवत पुढे पळालो.
साधारण 12:45 पर्यंत ठरल्यापैकी बऱ्याच भागातील सर्वेक्षण पूर्ण झालं होतं. हात पाय पण थोडे (जास्त) ओरडू लागले होते. शेवटी आता हे शेवटचं घर मग थांबवूया ठरवून त्या घरातल्या मावशींना आवाज दिला.
त्यांनी आम्हालाच उलट सांगितलं, "जा जा, मला काही होत नाहीये. मी नाही तपासणी करून घेणार."
आला की आता प्रश्न. पहिली व्यक्ती होती सकाळपासून जिने "नाही" म्हटलं होतं. पण "संघी" हे माघार घेत नसतात. त्यामुळे त्या मावशींना आधी गोड बोलून सांगून पाहिलं. ऐकत नाही म्हटल्यावर थोडा रागवून म्हटलं, "तुमच्याचसाठी करतोय हे सगळं". मग मात्र स्वारी आली समोर. त्यांचा विचार बदलायच्या आत पटापट रिडींग घेतले, नोंद केली तक्त्यात आणि आता निघुया म्हणत पुन्हा सकाळी जिथे आम्हाला सोडलं होतं त्या दुकानाजवळ येऊन थांबलो.

क्रमश:

🚩🚩 संघशक्ती युगे युगे 🚩🚩

🚩 भाग एक🚩

काही दिवसांपूर्वी धारावी मध्ये कोरोना चा जवळपास नायनाट अशा बातम्या आल्या. तिथे मुख्यत्वे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काम केल्याचं पाहून समाधान वाटलं होतं. पण त्यानंतर आलेल्या बातम्या/सोशल मीडिया वरच्या पोस्ट्स वर त्याला विरोध झाला, की संघाने तिथे काही कामच नाही केलं आहे, वगैरे. स्वतः काहीही न करणाऱ्या संघटना/लोकं ,इतकं मोठं काम करूनही त्या संघाला दूषणं देण्यासाठी मात्र समोर सरसावतात, ते वाचून थोडी नाराजी होती मनात. परंतु अंदाजे 14 किंवा 15 जुलै चा दिवसाने सगळं विचारचक्र पालटून टाकलं.
माझा (फेसबुक) मित्र अमेय गोखले ह्याने एक पोस्ट टाकली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित कोविड चाचणी मोहिमेत तो सहभागी झाला होता. त्याने पुढच्या 2-3 दिवसात त्याचे अनुभव शेअर केले होते.

ते वाचून डोक्यात सुरू झालं की आता आपण सुद्धा ह्या मोहिमेत सहभागी व्हायचंच.
माझ्या शेजारी राहणारे श्री. अजित टिपरे काका ह्यांच्या कानावर मी माझ्या मनातलं सांगितलं, त्यांनी मला श्री मनोज कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून दिला.
शुक्रवारी 24 जुलै ला सायंकाळी मी मनोजजींना फोनवर विचारलं की माझी इच्छा आहे संघाच्या कोरोना संबंधित कोणत्याही मोहिमेत सहभागी होण्याची.
मला ते इतकंच म्हणाले, उद्या सकाळी 7 वाजता तयार रहा.
ठरल्याप्रमाणे शनिवार 25 जुलै सकाळी मी त्यांना भेटून आम्ही निघालो.
कैलास मठ-भक्ती धाम, नाशिक येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती चे कार्यकर्ते जमले होते. आज कोरोना चाचणी मोहीम सुरू होणार होती.
मनोजजींनी मला सांगितलं की तू आज इथे व्यवस्था विभागात काम कर. संघाच्या ह्या पवित्र कामात आपला हातभार कोणत्या ना कोणत्या रुपात लागतोय हे माझ्या साठी भाग्याचं होतं. लागलीच इतर स्वयंसेवकांसोबत कामाला लागलो. काम करता करता बोलणं व्हायचं तशी ओळख होत होती. ज्या टिम्स सकाळी कोरोना चाचणी मोहिमेसाठी जाणार होत्या त्याचे किट रेडी करायची जबाबदारी अमही तिघांवर होती. PPE किट, ग्लोव्हज(PPE किट सोबत एक जोडी असतेच पण तरीही प्रत्येकाला 2 जोड्या extra ठेवत होतो) , फेस शिल्ड, सॅनिटायझर ची बाटली, ऑक्झिमीटर आणि टेम्परेचर मोजणारी गन, असे सेट व्यवस्थित रेडी करून ठेवले होते.
टिम्स जशा येऊ लागल्या तस आम्ही एक एक सेट देत होतो.
प्रत्येकाला त्याबद्दल पूर्ण माहिती सांगितली जाते होती.
7 टिम्स झल्या नंतर लक्षात आलं की 8 व्या टीम मध्ये सदस्य कमी आहेत. एका टीम मध्ये 4 सदस्य अशी रचना होती परंतु काही कारणांमुळे ते दोघे येऊ शकले नव्हते.
हे सगळं सुरू असताना अचानक कानावर पडलं, "कोणी जाऊ शकतंय का स्क्रिनिंग साठी, 8 नंबर टीम सोबत"
मी क्षणात त्या आवाजाच्या दिशेने गेलो- जयेश जी होते, त्यांना म्हटलं, मला जायचं आहे.
ते म्हणाले, तिकडे नाव नोंदणी कर, तुमचं PPE किट घ्या आणि सुरू करा मोहीम.
उड्या मारत काउंटर वर गेलो, तिथे श्रीपाद उभा होता, तो ही माझ्यासारखाच व्यवस्था साठी आलेला, पण टीम मध्ये एक जण कमी पडतोय म्हणून फिल्ड वर जाण्याची इच्छा, म्हणून नाव लिहीत होता.
पुढच्या 15 मिनिटात सर्व सोपस्कार पार पाडून आम्हाला आमचे PPE किट मिळाले.
सर्व सूचना पुन्हा पुन्हा सांगण्यात आल्या.
PPE किट अंगावर चढवणं हा मोठा टास्क आहे. आजवर फक्त फोटो मध्ये बघितलेले PPE किट आता आपण स्वतः घालणार आहोत, हा विचारच भन्नाट होता.

तो जम्प सूट, फेसशील्ड, आणि मग त्याच मटेरियल चे बूट घालून आम्ही अंतराळवीर तयार झालो.
एक एक करत टीम कामगिरीवर निघत होत्या.
"टीम क्रमांक 8 रेडी आहेत का?" असा जयेशजींचा आवाज येताच आम्ही चौघे म्हणजेच मी-राजेंद्र देशपांडे, श्रीपाद चंद्रात्रे, निनाद कुलकर्णी आणि शुभम महाले असे चौघे अंतराळवीर निघालो.
बाहेर एक इनोव्हा उभी होती. ती गाडी आम्हाला आमच्या चाचणी साठी नेमून दिलेल्या गल्लीपर्यंत आमच्या सोबत होती. एक स्थानिक कार्यकर्ता सोबत होता, ज्याने आम्हाला कोणकोणत्या गल्ल्यांतून आम्ही स्क्रिनिंग करायचं आहे ते सांगितलं आणि आमची मोहीम सुरू झाली...

क्रमशः: