Saturday, 25 November 2023

शापित राजकन्या

 " शापित राजकन्या "


माया : ताडोबा बद्दल ज्या व्यक्तींना माहिती आहे, जे जाऊन आले आहेत किंवा ताडोबाचे फोटो, व्हिडियो फॉलो करतात त्या सर्वांच्या परिचयाची ही आमची माया

हिलटॉप मेल आणि नीरा ह्या ताडोबा मधल्या जोडप्याला झालेल्या 4 मुलांपैकी एक म्हणजे माया.

साधारण 2010 मधे जन्म झालेली माया 4 भावंडांपैकी एक होती.

माया ची आई निरा चा एरिया म्हणजे जामनी चा काही भाग, ताडोबा लेक, पांढरपौनी च्या आसपासचा भाग.

नीरा ला लेडी ऑफ लेक - म्हणजेच तलावांची राणी म्हटलं जायचं.

माया अंदाजे दोन वर्षांची असताना म्हणजे नीरा चा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला. नीरा च्या अकाली मृत्यू नंतर तिच्या टेरीटरी वर माया ने ताबा घेतला. नुकत्याच adulthood मधे आलेल्या माया कडे इतका मोठा एरिया आला होता.

पलीकडे छोटी तारा मोहर्ली हून तिच्या आई वडिलांकडून वेगळी होऊन कोसीकनाल, वसंत बंधारा आणि जामनी चा काही भाग अशा भागात वावरत होती.

माया ने हळूहळू आईच्या पूर्ण एरिया वर ताबा मिळवला. लवकरच मायाने सुद्धा आईला मिळालेलं बिरूद साध्य करत स्वतः ला लेडी ऑफ लेक म्हणून सिद्ध केलं.

मायाने ताडोबा तलाव, पांढरपौनी चे दोन्ही तलाव, 97 वॉटरहोल, असा बऱ्यापैकी भाग स्वतः पादाक्रांत केला होता. भरपूर पाणी, त्यामुळे मुबलक गवत आणि त्यामुळे भरपूर प्रमाणात चितळ, सांबर, गवे, अश्या समृद्ध भागाची ती राणी बनली होती.

आता राणी म्हटलं तर तिला एक राजा पण असणारच. तिने राजा म्हणून निवडला होता गब्बर. पांढरपौनी, जामनी भागातला त्यावेळेसचा एक राजा म्हणजे गब्बर.

साधारण २०१४ च्या मध्यात मायाला गब्बर पासून दोन पिल्लं झाली. लवकरच काही महिन्यांमधेच काही कारणांनी ती दोन्ही पिल्लं गेली. जंगलात कुणालाच स्पर्धा नको असते. आपल्याशी स्पर्धा करणाऱ्याला नामोहरम करण्याचं प्रत्येकाचा प्रयत्न असतो. असं म्हणतात की ढोल म्हणजेच जंगली कुत्र्यांनी माया च्या त्या पिल्लांना मारलं असावं. अर्थात नक्की काय हे प्राणी जगतच जाणो.

पुढे काही दिवसातच गब्बरला रेडिओ कलर लावल्यानंतर तो थोडासा त्या एरियातून बाहेर पडायला लागला होता.

त्यानंतर मायाला त्या भागात येणाऱ्या टायसन पासून तीन पिल्लं झाली. पैकी दोन मेल होते तर एक फिमेल होती. तिन्ही पिल्लांचा आईसोबत तिच्या टेरीटरी मधे वावर वाढला होता. 

मधल्या काळात एक नव्या मेल वाघाचा वावर मायाच्या एरियात दिसू लागला होता. मात्र त्या पिल्लांचा वडील नसूनही त्याचा पिल्लांसोबतच सहज वावर असणं, त्यांचा वडील नसूनही त्यांनी पिल्लांना काही न करणं, हे मात्र थोडं अचंबित करणार होतं. पुढे काही वर्षांनी लक्षात आलं की आपल्या पिल्लांना वाचवण्याकरता माया ने असे काही वेळा त्या एरियात आलेल्या इतर मेल वाघासोबत, जो तिच्या पिल्लांचा वडील नाहीये, फॉल्स मेटिंग केलं होतं, जेणेकरून त्याची खात्री व्हावी की ती पिल्ले त्याचीच आहेत आणि तो त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास देणार नाही. एखाद्या वाघिणीने असं काही करणं थोडं वेगळं होतं.

शक्यतो वाघांमध्ये मेल वाघ पिल्लांना वाढवण्याच्या फंदात पडत नाहीच. ते सगळं आईच करते. त्यामुळे गब्बरच्या अनुपस्थितीमधे पिल्लांकडे माया एकटीने लक्ष देऊन त्यांना वाढवत होती.

रोज आपल्या पिल्लांना फिरवणे असेल, त्यांच्यासाठी शिकार करून आणणे असेल, माया पिल्लांसाठी सगळं करत होती. रोज, अगदी रोज माया आणि पिल्लांचे सायटींग होत असे. आधी आई सोबत दुडूदुडू धावणारी पिल्ले आईसोबत मस्त खेळत असायची. आई सोबत असली की कितीही गाड्या असल्या तरी बिनधास्त त्यांच्याबाजूने चालत जायची. ही सगळी किमया मायाच्या बोल्डनेस ची होती.

म्हणूनच कदाचित असेल, माया सुद्धा मोस्ट फोटोग्राफ्ड टायग्रेस कडे वाटचाल करू लागली होती.

जंगलात कधीही जा, माया प्रत्येक गाडीला दर्शन देत असे. पर्यटक फ्रेंडली वाघीण अशीच मायाची ओळख निर्माण झाली होती.

मायाचा धीटपणा तर भन्नाट होता. आपलं आवडतं खाद्य सांबर तर ती मारायचीच. परंतु जवळपास 800 किलो पर्यंत वजन असलेल्या रानगव्याचा सुद्धा फडशा पाडण्यात माया यशस्वी ठरायची.

पण दरम्यानच्या काळात बफर मधून कोअर पर्यंत आपली टेरीटरी वाढवत आलेला मटकासुर हा मायाच्या एरियात दिसू लागला होता. मात्र त्याचे इरादे मायाच्या पिल्लांबाबत काही योग्य नव्हते. माया जवळ जरी जात असला तरी पिल्लांना त्याने हटकायला सुरुवात केली होती.

कुठलाही मेल वाघाला हेच वाटत असतं की त्या फीमेल ला झालेली पिल्लं ही माझीच असावी. त्यामुळे आधीच्या पिल्लांना ते अगदी मारूनही टाकू शकतात.

हेच मायाच्या पिल्लांसोबत झालं. मटकासुर ने त्या पिल्लांना तर द्यायला सुरू केलं. एक फीमेल आणि एक मेल पिल्लांना त्याने पळवून लावलं. ती नंतर कुठे गेली हे अद्याप कळलेले नाही. दुसरा मेल पिल्लू मात्र बरेच दिवस मायाच्या एरियात किंवा त्या आसपास कुठे ना कुठे दिसत तरी होता. पण नंतर तो सुद्धा दिसेनासा झाला.

एक मात्र होतं, ह्या पिल्लांपैकी एका पिल्लासोबतचा मायाचा एक फोटो खूप प्रसिद्ध झाला. त्या फोटोचा भारतीय डाक विभागाने एक स्टॅम्प सुद्धा प्रसिद्ध केला होता.

इकडे पुढच्या काही महिन्यातच माया आणि मटकासुर च्या मेटींग ने मायाला पुन्हा दोन पिल्लं झाली. पैकी एक फिमेल होती तर एक मेल. ताडोबा तलाव, पांढरपौनी ह्या भागात माया त्या दोघांना मस्त वाढवत होती. कधी न कधी मटकासुर सुद्धा पिलांसोबत दिसत असे.

पण लवकरच मटकासूर ला सुद्धा त्याच्या भागामध्ये कॉम्पिटिशन आली होती. ताला, रुद्र, बलराम अशी वेगवेगळे वाघ मटकासुरच्या एरियामध्ये दिसू लागली होते. कोणी कोळसा झोन मधून आला होता, तर कोणी मोहरली मधून आला होता. प्रत्येक वाघ स्वतःसाठी एरिया शोधत असतो. असलेला एरिया वाढवत असतो. त्यामुळे हे सगळं नैसर्गिक होतं. पण या सगळ्यांमध्ये मटकासुरला मात्र त्याचा एरिया परत सोडावा लागला आणि त्याला पुन्हा एकदा बफरकडे वळावे लागले.

मायाच्या दोन पिल्लांना सूर्या आणि मीरा अशी नावे दिली होती. ते दोघे छान वाढत होते. आईकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकत होती. धीटपणे जंगलात वावरत होते. परंतु दुर्दैवाने ऑक्टोबर 2019 ला मीराचा मृत्यू झाला. ती दोन वर्षांची होत आली होती. दोघे जण आईकडून शिकारीचे शिक्षण घेत होते. परंतु शिकार करण्याच्या नादात मीराला रानगव्याची शिंगं लागली आणि त्यात जबर जखमी होऊन ती गेली. इकडे इतर मेल वाघ त्याभागात सतत येत असल्यामुळे सूर्या सुद्धा थोडासा भयभीत झाला असावा. त्यामुळे त्याने सुद्धा विचार केला की हा भाग सोडावा. स्वतःसाठी सुरक्षित जागा शोधत शोधत सूर्या पार ताडोबा सोडून उमरेड कारंडला जंगलापर्यंत पोहोचला. त्याने तिथे स्वतःचा एरिया बनवायला सुरुवात केली. आज उमरेडच्या जंगलातील बऱ्यापैकी मोठ्या भागाचा तो अनभिषिक्त सम्राट झाला आहे.

इकडे माया पुन्हा एकटी पडली होती. पुढे 2020 च्या मध्यात तिला रुद्र पासून 4 पिल्लं झाली. त्यातील एक पिल्ल लवकरच दगावलं. परंतु इतर तिघे मात्र छान मोठे होत होते. 

ह्याच काळात अजून एक दुर्दैवी घटना घडली. एके दिवशी कक्ष क्रमांक 97 जवळ वनविभागाचे कर्मचारी जास्त घालत असताना तिथेच माया, तिचे एक पिल्लू, तसेच तिने केलेली एक शिकार तिथे जवळच होते. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना शिकार आणि पिल्लू ह्यांची कल्पना नसल्याने समोर दिसलेली माया पाहून त्यांनी रस्ता बदलला आणि आतल्या भागातून जाण्याचा निर्णय घेतला. परंतु दुर्दैवाने मायाने त्यांच्यावर हल्ला केला ज्यात वनविभागाच्या एक महिला कर्मचारी ठार झाल्या. मायाच्या नावावर ह्या अजून एका दुर्दैवी घटननेची नोंद झाली होती.

मायाच्या नशिबात ह्यावेळी सुद्धा पिल्लांना पूर्ण मोठं बघणं नव्हतं. तिचा एरियाच इतका मोठा आणि शिकार तसेच पाण्याने समृद्ध होता, की तो इतर मेल वाघांना आकर्षित करत होता. त्यामुळे त्या भागात सतत नव्या मेल वाघांचा वावर होत होता.

ह्या सगळ्याचा सगळ्यात मोठा धोका मायाच्या पिल्लांना होता. आणि शेवटी तेच झालं जे आधीच्या पिलांसोबत झालं. ही पिल्लं सुद्धा हळूहळू एकएक करत गायब होऊ लागली होती. 

हिलटॉप मेल आणि नीरा ची ही सुंदर, लोभस आणि बोल्ड राजकन्या स्वतःचा एरिया ताब्यात ठेवण्यात जितकी यशस्वी होती तितकीच पिल्लांना पूर्ण वाढवण्यात अपयशी ठरत होती. कुठला अभिशाप मायाला भोवत होता कुणास ठाऊक. 

पुढे जानेवारी 2023 मधे माया पुन्हा एकदा पिल्लांसोबत दिसली. पुन्हा एकदा माया आणि पिल्लं पर्यटकांना आकर्षित करू लागले होते. आणि पुन्हा एकदा तोच दुर्दैवचा फेरा सुरू झाला होता. जून पर्यंत मायाचं एकच पिल्लू दिसत होतं. 30 जून 2023 रोजी कोअर पर्यटन सफारी बंद झाल्या. 1 ऑक्टोबर ला सफारी पुन्हा सुरू होणार होत्या. मधल्या काळात 23 ऑगस्ट ला वनविभागाच्या गस्ती गाडीला माया दिसल्याची बातमी आली.

1 ऑक्टोबर ला पर्यटन सुरू झालं, दोन तीन आठवडे उलटून गेला, पण माया ने अजून दर्शन दिलं नव्हतं. तमात वन्यप्रेमींच्या अक्षरशः काळजाचा ठोका चुकु लागला होता. जसजसा एक एक दिवस मावळत होता, तसेतसे सगळे चिंतातुर होऊ लागले होते.

समोर कितीही गाड्या असल्या तरीही कुणाचीही भीडभाड न ठेवता जंगलात वावरणारी माया अचानक पूर्णपणे दिसेनाशी झाली होती. तब्बल महिना उलटून गेला पण मायाचे दर्शन होत नाही म्हटल्यावर वनविभागाने पाऊले उचलत मायाच्या आणि आसपासच्या भागात कॅमेरा ट्रॅप्स लावायला सुरुवात केली. जवळपास 150 कॅमेरे लाऊन वनविभाग मायाला शोधण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्यात सुद्धा वनविभागाला अपयशच आलं.

इतर अनेक प्राणी, वाघ कॅमेऱ्यात कॅप्चर झाले होते पण एकाही कॅमेरा मधे माया मात्र काही दिसली नव्हती. शेवटी वनविभागाने शेवटचा आणि खात्रीचा पर्याय म्हणून Foot Patrloing म्हणजेच पायी गस्त मोहीम आखली. 16-17-18 नोव्हेंबर असे तीन दिवस मायाच्या एरियात पायी वनविभागाचे कर्मचारी पायी फिरून तिचा शोध घेत होते. 18 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास वनविभागाला कक्ष क्र 82 मधे काही हाडे सापडली. सुमारे काही मीटर अंतर विखुरलेली तो हाडे वनविभागाने एकत्र केली.

प्राथमिक अंदाज ती हाडे वाघाची असावीत असा होता. सध्या ही हाडे बंगलोर ला पुढील जैविक DNA तपासणीसाठी पाठवली आहेत. सदर संस्थेचा रिपोर्ट 30 नोव्हेंबर ला अपेक्षित आहे.

वन्य प्रेमींच्या मनातली शंका खरी ठरेल का, की ती माया नसून आत कुठेतरी जंगलात असलेली माया पुन्हा एकदा बाहेर येऊन आपल्या साम्राज्यात त्याच ऐटीत वावरेल, हे सगळं काळच ठरवेल.

पण ह्यापैकी एकही गोष्ट होत नाही तोपर्यंत मायाच्या आठवणी रोज मनात येतच राहतील. तिचं डौलदार चालणं, तिचा गाड्यांसमोर चा बिनधास्त वावर, ह्या भागाची मीच राणी आहे हा थाट, आणि चेहऱ्यावरची ती नजाकत, ह्यातला एकही गोष्ट मनातून कधीच जाणार नाही.

अर्थात हे सगळं घडत असताना एक मात्र मनात सतत येतच राहतं - एक संध्याकाळ अशी येईल जेव्हा सूर्य मावळतीला जाताना माया तिथे जंगलात असेल, पण उगवेल तेव्हा सूर्यकिरण आपल्या सोनेरी कांतीवर मिरवत डौलात चालणारी माया जंगलात नसेल.

कितीही नकोसं वाटलं तरी ह्याला कधी न कधी सामोरं जावं लागणारच आहे. तो दिवस लवकर न येवो हीच सूर्यनारायणाला प्रार्थना.

माया - तू जिथे असशील तिथून आम्ही तुला दिसत असू ना  ग. आम्हाला तू पुन्हा हवी आहेस. तुझे तमाम वेडे तुझी वाट बघत आहेत. तुझ्या शिवाय आमच्या कॅमेऱ्याचे क्लिक कसे वाजतील ग...

तू पुन्हा ये ग माया...

आमच्यासाठी तरी ये ग...


राजेंद्र देशपांडे

24 नोव्हेंबर 2024

1 comment: