Tuesday, 28 July 2020

🚩🚩 "संघा वाचून कोण स्वीकारील काळाचे आव्हान" 🚩🚩

🚩 भाग दोन 🚩

फुले नगर, पेठ नाका ह्या भागातील नागरिकांचं आम्हाला स्क्रिनिंग करायचं होतं.
इनोव्हाने आम्हाला तिथे सोडलं. आम्ही चौघे हे काम आयुष्यात पहिल्यांदा करत होतो. मनात थोडी काळजी होती कारण आम्ही ज्या भागात आलो होतो तो भाग "कोरोना बाधित प्रतिबंधित क्षेत्र" होता. त्यामुळे आम्हाला सर्वतोपरी काळजी घेणं अतिशय गरजेचं होतं.
कुठून सुरुवात करायची यावर आमच्या सोबत जो स्थानिक कार्यकर्ता होता त्या मित्रा सोबत बोललो आणि गल्लीच्या तोंडावर एक छोटं दुकान होतं तिथून सुरू करूया असं ठरवून आमची हत्यारं- टेम्परेचर गन, ऑक्झिमिटर, सॅनिटायझर चा स्प्रे आणि नोंदणी चा चार्ट घेऊन सरसावलो.
हे सांगायला नक्कीच आवडेल की आम्ही चाचणी साठी समोर येतोय हे पाहून दुकानातील काका स्वतःहून समोर आले. "दादा, घ्या तपासा मला" अस म्हणताच एक वेगळाच कॉन्फिडन्स आला आमच्या मनात. मग त्यांचा भाऊ पण आला. दोघांचे टेम्परेचर आणि ओक्झिमीटर सुद्धा नॉर्मल होते. ते पाहून जरा हायसं वाटलं.
सुरुवात अतिशय चांगली झाली होती. मग काय, पहिल्या ओव्हर ला सांभाळून खेळल्यावर जसं आत्मविश्वास येतो तसंच झालं आमचं.
एक एक गल्ली सुरू केली. गल्लीत शिरून डावी अन उजवीकडच्या घरात आवाज द्यायला सुरुवात केली. दार बंद असेल तर हात न लावता बेल वाजवायला अथवा दारावर ठकठक करायला एक किल्ली च्या आकाराचं हार्ड प्लास्टिक सोबत दिलं होतं ज्यामुळे आमचा कुठेही इतर स्पर्श होऊ शकणार नव्हता. आमच्या सुरक्षिततेची इतक्या बारकाईने काळजी घेतली होती.
एक एक घरातुन सदस्य बाहेर येत होते. "मावशी, मास्क घाला आणि समोर येऊन तुमचं नाव सांगा" असं म्हणताच त्या काकू/मावशी/आजी लगबगीने आत जाऊन मास्क घालून बाहेर येत होत्या. एक दोन ठिकाणी मास्क नाही सापडलं तर रुमाल/पदर बांधून समोर आल्या. पण बाहेर आल्या हे सगळ्यात महत्वाचं.
काही घरांत मास्क ही परवडत नाही म्हणून घेतले अन घातले नव्हते हे ही एक विदारक सत्य समोर आलं. पण आम्हाला त्याक्षणी त्यांना इतर कोणतीही मदत करणं शक्य नव्हतं.
आधी काही वेळ मी लिहिण्याचं काम करत होतो. श्रीपाद ने टेम्परेचर बघायचं, तर शुभम ने त्या त्या व्यक्तीच्या हातावर सॅनिटायझर मारलं की निनाद त्यांचं ऑक्झिमिटर ने रिडींग घेणार, अशी कामं आम्ही वाटून घेतली होती.
आम्हाला दोन तक्ते दिले होते. पांढरा आणि निळा.
सर्वसामान्य नोंदणी पांढऱ्या तक्त्यात करायची होती. मात्र जर एखाद्या व्यक्तीचे तापमान आणि ऑक्झीमीटर रिडींग हे रेंजच्या बाहेर (कमी किंवा जास्त) असतील तर त्यांची नोंद निळ्या तक्त्यात सुद्धा करायची होती.
अंदाजे 10 ते 12 नावं झाल्यावर निनाद ने तक्ता लिहिण्याचं काम स्वतःकडे घेतलं आणि मला टेम्परेचर चेक करण्याचं काम दिलं (त्याने माझं अक्षर बघितलं होतं आणि हे वाचायला मला बोलवायची वेळ वगैरे येईल असा विचार त्याच्या मनात आला असावा )
असो,
अंदाजे 12:30-12:45 पर्यंत आमचं काम सुरू होतं.
जितक्या घरांमध्ये आम्ही गेलो, त्यात जास्तीत जास्त घरात पुरुष कमी होते कारण बरेचसे कामाला गेले होते. वेगवेगळ्या वयोगटातील लहान मुलं आणि महिला ह्यांच प्रमाण जास्त होतं. एक विशेष म्हणजे बऱ्याच महिलांना त्यांचं वय ही माहीत नव्हतं. बाजूला 2-3 पोरं आणि ते ही अंदाजे 5 ते 8 वर्षांची असताना त्या महिलांना वय विचारलं तर उत्तर यायचं, माहीत नाही, 21 लिहून टाका.
आधी आमची जमा गडबड झाली, पण नंतर आम्ही ठरवलं एकतर त्यांना विचारायचं, किंवा साधारण अंदाज घेऊन लिहायचं.
वर कडक ऊन आणि अंगात PPE किट या डेडली कॉम्बिनेशन ने शरीराची वाट लागली होती. आम्ही आत मध्ये घामाने चिंब भिजलो होतो. दिहायड्रेशन सारखं वाटू लागलं होतं, पण मनात एकच होतं, की आपलं काम संपल्याशिवाय हार मानायची नाही.
सकाळी निघताना गायलेलं "संघा वाचून कोण स्वीकारील काळाचे आव्हान" हे डोक्यात फिट बसलं होतं. त्यामुळे माघार घ्यायचा तर प्रश्नच नव्हता.
काही ठिकाणी गोठे होते, सर्वत्र शेण पडलं होतं, त्यातून वाट काढत आम्ही एक एक गल्ली सर करत चाललो होतो. एक दोन ठिकाणी कुत्री भुंकायला लागल्यावर जरा तंतरली होती आमची. पण टॉमी यु यु वगैरे करत त्यांना मनवत पुढे पळालो.
साधारण 12:45 पर्यंत ठरल्यापैकी बऱ्याच भागातील सर्वेक्षण पूर्ण झालं होतं. हात पाय पण थोडे (जास्त) ओरडू लागले होते. शेवटी आता हे शेवटचं घर मग थांबवूया ठरवून त्या घरातल्या मावशींना आवाज दिला.
त्यांनी आम्हालाच उलट सांगितलं, "जा जा, मला काही होत नाहीये. मी नाही तपासणी करून घेणार."
आला की आता प्रश्न. पहिली व्यक्ती होती सकाळपासून जिने "नाही" म्हटलं होतं. पण "संघी" हे माघार घेत नसतात. त्यामुळे त्या मावशींना आधी गोड बोलून सांगून पाहिलं. ऐकत नाही म्हटल्यावर थोडा रागवून म्हटलं, "तुमच्याचसाठी करतोय हे सगळं". मग मात्र स्वारी आली समोर. त्यांचा विचार बदलायच्या आत पटापट रिडींग घेतले, नोंद केली तक्त्यात आणि आता निघुया म्हणत पुन्हा सकाळी जिथे आम्हाला सोडलं होतं त्या दुकानाजवळ येऊन थांबलो.

क्रमश:

2 comments:

  1. नमन तुम्हा team ला

    ReplyDelete
  2. राजेंद्र तू अनुभवलेल्या क्षणातून आजही तीन महिन्याहून जास्त काळ गेला तरी निदान ह्या आहे ते उत्पन्नही थांबल्याने अवघडलेल्या जनतेला साधे कापडी मास्क पुरवणे तंटेही अगदी मोफत हे किती महत्वाचे काम आहे ह्याचीही जाणीव कोणत्याच नेत्यांना नाही हे प्रकर्षाने जाणवते. आपल्या नाशिक सारख्या शहरात मोफत मास्क पुरवणे हि मोठी ऍक्टिव्हिटी करण्याची गरज आहे. कारण यंत्रणेतील मोजक्याच असणाऱ्या किडीने अन्य यंत्रणा हि ठप्प केली असते त्यामुळे हे काम पैश्यांच्या मंजुरीच्या नावाने थांबेल किंवा नेहमीच काही होईल.

    सर्वांचा फीडबॅक वरून अंदाजे गरज काढणे आवश्यक आहे , कारण ह्यापुढे मास्क हि काही महिने घर बाहेर पडतानाची गरज असणार आहे.

    असो छान लिहितो आहेस. असेच ओघवते लिहीत राहा. कल्याणमस्तु.

    ReplyDelete