Monday, 11 August 2014

दहीहंडीचा तमाशा

                सानपाडयाचा किरण तळेकर, जोगेश्वरीचा हृषिकेश पाटील ह्या गोविंदांचा सरावादरम्यान पडून मृत्यु झाला. त्याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय. लोकांच्या मनात चिड आहे पण बोलणार कोण म्हणून सगळेच गप्प बसलेत. सरकारने १२ वर्षाखालील मुलांना दहिहंडीमधे सहभागी होण्यास बंदी घातली आहे. मात्र असे असुनही दहिहंडी मंडळांनी मुजोरी दाखवत आम्ही हा निर्णय मानणार नाही असा पवित्रा घेतलाय. या पार्श्वभूमीवर किरण आणि हृषिकेशच्या मृत्यूने अनेक प्रश्न पुन्हा उभे केले आहेत.

                गोविंदांच्या सुरक्षेचा मुख्य प्रश्न आहे. भरमसाट पैशांची बक्षीसे समोर असताना सर्वच मंडळांनी गोविंदांच्या सुरक्षेला कमी महत्व देऊन आम्ही पैशाच्या मागेच धावणार असंच ठरवलेलं दिसतंय.
शिवाय प्रत्येक हंडी कोणत्या ना कोणत्या राजकीय नेत्याच्या आशिर्वादाने चालत आहे. प्रत्येक हंडीवर हजारो लाखोंची बक्षीसे लावून जास्तीत जास्त गोविंदा मंडळांना आकर्षित करायचा धंदा या राजकारण्यांनी चालवला आहे. त्याला खतपाणी देण्याचं महान काम प्रसारमाध्यमे (वृत्त वाहिन्या आणि वर्तमानपत्रे) सतत करत असतात.

                दहीहंडी मंडळांचे "कार्यकर्ते" बीभत्स चाळे आणि तमाशे करत बाइक आणि ट्रक ने शहरभर फिरत असताना हंडीचं "लाइव्ह कव्हरेज" दाखवण्याच्या नादात आपणच या फालतुगिरी आणि घाणेरडेपणाला अति महत्व देतोय हे मात्र आपली "जागरूक" प्रसारमाध्यमे सोयीस्कररीत्या विसरून जातात.

                हंडी फोडण्याच्या कामगिरीवर निघालेले "सक्रीय" कार्यकर्ते दिवसभर बाइकवर फिरताना हेल्मेट न घालता हिंडत असतात. पण आपण गोविंदा आहोत त्यामुळे आजच्या दिवशी कोणताही पोलिस आपल्याला पकड़णार नाही याची खात्री असल्यानेच या गोविंदांची मुजोरी दरवर्षी वाढतच चालली आहे.


                हंडी उभारण्यातुन मिळणारे पैसे आमच्या खिशात, पण जखमी झालेल्या गोविंदाच्या उपचाराचा खर्च मात्र सरकार आणि विमा असल्यास विमा कंपनीने उचलायचा अशी भूमिका सर्व मंडळे घेतात, हे फार दुर्दैवी आहे. खरंतर जर सरकारने घालून दिलेले नियम पाळायचे नसतील तर मग सरकारने तरी जखमी झालेल्या गोविंदांची जबाबदारी किंबहुना त्याच्या उपचाराचा खर्च का उचलावा. उलट नियम मोडले म्हणून त्या मंडळावरच कारवाई का केली जाऊ नये.

                तसेच जखमी झालेल्या गोविंदांना विम्याचे पैसेतरी का मिळावेत. जर आत्महत्या केल्यास विमा मिळत नसेल तर बंदी असतानासुद्धा वर चढून मृत्युमुखी पडलेल्या गोविंदांच्या मृत्युला पण आत्महत्येचा दर्जा का दिला जाऊ नये. जखमी/मृत्यु पावलेल्या गोविंदाच्या परिवराला सुद्धा याबाबत जबाबदार धरलं तरच इतर गोविंदांच्या घरच्यांचे डोळे उघडतील अशी अशी माफक अपेक्षा.


                तसं झालं तरच पुढे होणारे अपघात टळतील. अन्यथा दरवर्षी असे अनेक गोविंदा जखमी होतील अथवा आपल्या प्राणांना मुकतील, आणि सामान्य लोक जे घरी बसून हा पैशाचा खेळ टीव्हीवर बघत फ़क्त हळहळ व्यक्त करत बसु...

No comments:

Post a Comment